मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल भूमिका मांडत ९ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता त्यांनी याबद्दल यु टर्न घेत आपला मोर्चा या कायद्याच्या पाठींब्यासाठी नसून घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशी लोकांना समर्थन देणाऱ्यांच्या विरोधात असल्याचं स्पष्ट केलंय.. राज ठाकरे यांनी आज मुंबईत ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. एनआरसी आणि सीएए या कायद्याबद्दल मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ९ फेब्रुवारीला मुंबईत निघणारा मोर्चा हा या कायद्याच्या समर्थनार्थ नसल्याचं सांगतानाच पाकिस्तानी घुसखोर आणि बांगलादेशींना समर्थन देणाऱ्यांच्या विरोधासाठी हा मोर्चा काढला जाणार असल्याचं नमूद केलंय.. याशिवाय मनसेची पुढील वाटचाल, भाजपबरोबर जाण्याबाबत चर्चा अशा विविध विषयांवर या बैठकीत उहापोह करण्यात आला.
राज ठाकरे महाअधिवेशनात काय म्हणाले होते?
महाअधिवेशनातील भाषणात राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ला जाहीर पाठिंबा दिला होता. देशाच्या इतर भागातून लोक देशात सरळ घुसखोरी करतात. त्यामुळे आपल्याला इतर देशांप्रमाणे कठोर व्हायला हवं. म्हणून पहिल्यांदा या देशात आलेले बांग्लादेशी आणि पाकिस्तानी मुस्लिम बाहेर काढले पाहिजेत. यासाठी माझा केंद्राला पूर्ण पाठिंबा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.










