बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या सभेत बोलताना अजित पवारांनी मी या निवडणुकीसाठी अधिकचा वेळ देऊ शकणार नाही, मात्र तुम्ही सर्व काही व्यवस्थित करा असे सांगितले होते. अगदी त्याबरहुकूम सर्व सोपस्कार पूर्ण पाडले असून, बारामती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे.
या बँकेच्या निवडणुकीत अर्ज भरलेल्यापैकी विद्यमान संचालक व बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सदाशिव सातव, देवेंद्र रामचंद्र शेळके, शिरीष दत्तात्रेय कुलकर्णी, रणजित वसंतराव धुमाळ, डॉ. सौरभ राजेंद्र मुथा, नामदेव निवृत्ती तुपे, नुपूर आदेश वडूजकर, विजय प्रभाकर गालिंदे, किशोर शंकर मेहता, उद्धव सोपानराव गावडे, मंदार श्रीकांत सिकची, जयवंतराव विनायकराव किकले, महिला प्रवर्गातून कल्पना प्रदीप शिंदे, वंदना उमेश पोतेकर, तर ओबीसी प्रवर्गातून रोहित वसंतराव घनवट यांचे एकमेव अर्ज निवडणूक प्रक्रियेत असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे.
या बँकेसाठी 15 संचालक निवडून द्यायचे होते. त्याकरिता 81 जणांनी अर्ज दाखल केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय संचालक मंडळ निवडू, ते मान्य करून इतरांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत, कोणीही नाराज होऊ नये अशा स्वरूपाचे आवाहन केले होते. दुसरीकडे एखाद्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यास सांगितल्यानंतर जर इतर कोणी त्यास फोन करुन अर्ज माघारी न घेण्यासंदर्भात हालचाल केली तर असे फोन रेकॉर्ड करून माझ्याकडे पाठवा अशा स्वरुपाचे एक वेगळ्या प्रकारचे आवाहन पवार यांनी केले होते.