सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर ऊसतोड मजूरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कुत्रे आडवे आल्याने ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक दाबला आणि ट्रॅक्टरची मागील ट्रॉली पलटी होऊन गंभीर अपघात घडला.

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांचा अपघात झाल्याने बारा जण गंभीर जखमी झाले. या जखमींमध्ये सात लहान मुलांचा समावेश असून या जखमींना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातात लहान मुलांना हातापायांना डोळ्यांना व डोक्याला मार लागून जखमा झाल्याने त्यांना मदत करणाऱ्यांचे मनही हेलावून गेले. अगदी हृदय पिळवटून टाकणारी घटना बुधवारी (दि.8) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. हे ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यातील आहेत.
हा अपघात इंदापूर शहराचा महामार्गाच्या बाह्य वळणालगत भिमाई आश्रम शाळे जवळील शिंदे चौकानजिक ढगे फार्महाउस समोरील सर्विस रस्त्यावर घडला. या वेळी अपघातात जखमी झालेल्या मजुरांवर उपचारासाठी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराच्या वार्डमध्ये कॉटची कमतरता दिसून आली. लहान मुले जखमी झाल्याने उपचारावेळी त्यांना त्यांचे आई, नातेवाईक कुठे पडलेत हे सुद्धा समजून येत नव्हते.
मुलांचे निरागस चेहरे नातेवाईकांना शोधत होते. जखमी झालेल्या मुलांकडे लक्ष द्यायला त्यांचे नातेवाईकच जखमी झाल्याने त्यांना लक्ष देता येत नव्हते. रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बारामती महिला रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे. जखमेतील सर्वजण ऊसतोड मजूर असून ते बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
ट्रॅक्टर चालक उसाचा मोकळा ट्रॅक्टर दोन ट्रॉली घेऊन पुणे बाजूने सोलापूर बाजूला जात होता. इंदापूर बाह्यवळण महामार्गावरील शिंदे चौकानजिक ढगे फार्महाउसजवळ सर्विस रस्त्यावर अचानक ट्रॅक्टरला समोरून कुत्रा आडवा आला. ट्रॅक्टरचालकाने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे ट्रॅक्टरच्या मागे जोडलेली रिकामे ट्रॉली पलटी झाली.
अपघातामध्ये मयुरी विठ्ठल मोरे (वय 6), लखन गायकवाड (वय 8), विवेक लखन गायकवाड (वय 6), कविता गंगाराम पवार (वय 6), सीमा संजय पवार (वय 18), रेश्मा सुनील सपकाळ (वय 30), अनिकेत पांडुरंग गायकवाड (वय 10), आरती लखन गायकवाड (वय 12), ज्योत्स्ना विठ्ठल माटे (वय 26), जनाबाई लखन गायकवाड (वय 26), आशा गंगाराम पवार (वय 60) सर्व राहणार बीड जिल्ह्यातील आहेत.
ट्रॅक्टर चालक परांडा येथील असल्याचे समजते. अपघात घडलेल्या या चौकामध्ये यापूर्वीही अनेक अपघात झाले आहेत. महामार्गावरील हा चौक अपघातांचा चौक होऊ पाहत आहे.