महान्यूज विशेष
उमाकांत कांडेकर
( सहसचिव, तरुणाई फाउंडेशन, खामगाव, जि.बुलढाणा )

एका लग्नाची कुतुहूल वाटावी अशी ही गोष्ट, अगदी कालचीच आहे, २८ नोव्हेंबरची. हेडिंग वाचून असा समज होईल की नवरदेवाने काहीतरी प्रताप केला असेल. आजकाल असे प्रकार घडतात. कुणी पळून जातं, कुणी हुंडा मागत, कुठं मानापमान नाट्य घडतं, कुठं वर पक्षाचे धिंगाणा घालतात वगैरे, पण तसं काही न करता अनावश्यक रूढी, खर्च, बडेजाव टाळून लग्न विधींना विधायकतेचं रूप देत हा आगळा वेगळा विवाह करण्याचे धाडस दाखविण्याचा ” प्रताप ” या नवरदेव आणि नवरीने केला. तो नवरदेव तरुणाई_फाउंडेशनचा कार्यकर्ता असल्याने या प्रबोधनात्मक, संदेशात्मक कृतीयुक्त लग्नाच्या आयोजनाची जबाबदारी तरुणाई फाउंडेशनकडे ओघाने आलीच.
तो कृषीपदवीधारक आणि ती आयटी_इंजिनिअर. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या सामाजिक कार्यकर्त्यांसोबत काम करण्याचा दोघांचा दांडगा अनुभव. दोघेही उच्च विद्याविभूषित अन संपन्न कुटुंबातील. दोघांचं मोठं नावाजलेलं घराणं, अश्या सोहळ्यासाठी भरमसाठ खर्च करण्याची दानत असलेले. मात्र त्यांनी विवाहाच्या सोहळ्याला विधायकतेच्या सोहळ्यात रूपांतरित केलं आणि सहभागी झालेल्या सर्वच वऱ्हाडी मंडळींना स्मरणात राहील अश्या गोष्टी या लग्नात घडवून आणल्या.
नवरदेव आणि नवरी
नवरा मुलगा आहे प्रताप गुलाबराव मारोडे, पळशी झाशी, ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा या छोट्या खेड्यात राहणारा. उच्च शिक्षण घेतल्यावरही शेतीला करिअर म्हणून निवडण्याची हिम्मत करणारा. जास्तीत जास्त उत्पादनाच्या लालसेने विषारी रसायनांचा प्रचंड वापर करून “परवडतच” नाही असं सांगणाऱ्याच्या गर्दीत तुलनेने कमी उत्पन्न देणारी सेंद्रिय विषमुक्त शेती करणारा. शेतमाल अडतीत न पाठवता स्वतः मार्केटिंग करणारा. शेतीतला शुद्ध भाजीपाला स्वतः बाजारात नेऊन व्यापाऱ्यांच्या बाजुला बसुन विकणारा. शेतीला व्यावसायिक पद्धतीने करून शेतकरी हे पद वलयांकित व्हावं अशी इच्छा ठेवणारा. दिल्लीच्या आंदोलनात अनेक दिवस सक्रिय राहून जिल्ह्यातही बैलगाडी मोर्चा काढणारा.
आणि लाखो रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या आय. टी. क्षेत्रातील नोकरी व पुण्यासारख्या मेट्रो सिटीतील उच्च तारांकित लाईफ स्टाईल लाथाडून खुर्द बुजरूक खेड्यातील शेतकऱ्याला वरणारी आणि त्याच्या सोबत शेतकऱ्याची घरधनीन बनणारी पद्मजा ही नवरी मुलगी, असं हे जोडपं .
पाणी फाउंडेशनच्या राज्यस्तरीय टीम मध्ये सोबत काम करताना आचार विचार जुळले. घरून सर्वच गोष्टींचे स्वातंत्र्य भेटलेले असले तरी घरच्यांची संमती मिळाल्यानंतरच दोघांनी नवजीवनाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. “लव्ह” ला “अरेंज” करून “मॅरेज” करण्याचं कौशल्य साधलं !
लग्नपत्रिका
“निसर्गाच्या साक्षीने विवाह” असं शीर्षक आणि वऱ्हाडी मंडळींना “श्रमदानरुपी आशीर्वादासाठी निमंत्रण” असा वेगळाच मजकूर या पत्रिकेत छापला गेला होता. गर्दी नको म्हणून मुळातच फार कमी लोकांना आमंत्रित केल्या गेल , त्यामागे हेतू चांगला होता. असं असलं तरी अनेकांनी तर पत्रिका कुठंतरी सोशल मीडियावर वाचून या सोहळ्याला कुतुहुलाने हजेरी लावलीच.
विवाह स्थळ
लग्न म्हटलं दारासमोर, मंदिराच्या, शाळेच्या प्रांगणात, मंगल कार्यालय, लॉन्स, हॉटेल असं आपल्या कुवतीनुसार स्थळ ठरतं. पण इथं ठिकाण ठरलं ते डोंगर, जंगल, शेती, आदिवासी पाडे, वन्यजीवांचा अधिवास अश्या चहुबाजुंनी असलेल्या निसर्गरम्य वातावरणात सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी. आचार्य विनोबांच्या भूदान यज्ञातील आणि महात्मा गांधी लोकसेवा संघाच्या जमिनीवर वसलेल्या सालईबन या पर्यावरण ग्रामात हा सोहळा संपन्न झाला. सालईबनात लग्न, वाढदिवस, पार्टी किंवा इतर सेलिब्रेशनसाठी नम्र नकार असतो. इथे हौशी पर्यटकांसाठी प्रवेश बंद केलेला आहे. फक्त पर्यावरण संबंधित उपक्रमच इथे राबविल्या जातात. इथे प्रवेशासाठी आता श्रमकार्य अनिवार्य करण्यात आलं आहे. हा सोहळा सालईबनचा सगळे उद्देश्य पाळूनच झाला.
अनोखे_विधी
लग्न लागण्यापूर्वी वर वधू आणि वऱ्हाडी मंडळींनी श्रमकार्य करून दोन बंधारे बांधले. तब्बल २ तास श्रमदान करून हे जोडपं मांडवात पोचलं. दोघांची वरात दमणीमध्ये (छोटी बैलगाडी) काढली. धान्याची नासाडी होऊ नये म्हणून अक्षतांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला गेला. झाडांच्या बिया, भाजी पाल्याच्या बियाण्यांचे कागदी पाकिटं मंडपातील लोकांना वाटले. गुरुदेव सेवा मंडळाच्या पद्धतीचे मंगलाष्टके झाली.
विवाहमुहूर्त होता महात्मा फुले यांचा स्मृतिदिन
दुपारी संविधानाची साक्ष घेऊन आणि हातात तिरंगा ध्वज ठेवत, पिंपळाच्या रोपाचे पुजन करत वर-वधुंनी एकमेकाला स्वीकारले. त्यापूर्वी दोघांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते खुप प्रभावी आणि समाजाच्या डोळ्यात अंजन टाकणारं ठरलं. महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन असल्याने त्यांच्यावरील क्रांतीसुर्य या ग्रंथाचं विमोचन त्यांच्या हस्ते झालं .
मंगलकार्य स्टेज
विवाहासाठी उभारलेला स्टेज हा सर्वांच्या आकर्षणाचा बिंदू ठरला. तरुणाई फाउंडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण जीवन दर्शविणारा स्टेज उभारण्यात आला होता. शेती अवजारे, जाते पाटे, उतरंड, तांब्याची भांडी, असं ओरिजनल साहित्य मांडण्यात आलं होतं. इथं सेल्फी आणि फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरला नाही. लग्न लागण्याआधीच अनेक जोडप्यांनी इथं फोटो सेशन केलं. ग्रामीण जीवन साहित्य, देशी बियाणे, आदिवासी पारंपरिक वाद्य अश्या विविध प्रदर्शनी मंडपात लावलेल्या होत्या. रांगोळीतून, हस्त लिखित फलकातून पर्यावरणाचे संदेश रेखाटले होते. बांबूंचे गेट उभारलेले होते
विषमुक्त भोजन
लग्नातलं जेवण हा मोठा महत्वाचा घटक असतो. त्यामुळे खुप भारी भारी मेन्यू ठेवले जातात. इथंही वेगळपण जपत मारोडे परिवाराने
स्वतःच्या शेतातील विषमुक्त अन्न धान्य, भाजीपाला वापरला. तांदूळ छत्तीसगड चा तर केमिकल विरहित गुळ गुजरातचा, शुद्ध तुप, रानभाजी म्हणून सुरण, आंबाडी चटणी तेही केळीच्या पानावर असं खऱ्या अर्थाने आरोग्यदायी जेवण वऱ्हाडी मंडळींना दिलं.
प्रतिष्ठितांची उपस्थिती
आमंत्रितांची मर्यादित संख्या ठेवली होती, सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित पूर्णवेळ उपस्थित होते. आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, विभागाचे आमदार डॉ. संजय कुटे, मलकापूरचे आमदार राजेश एकडे, प्रसेनजीत पाटील, स्वातीताई वाकेकर, बलदेवराव चोपडे, प्रकाश पाटील, संगीतराव भोंगळ, दत्ताभाऊ पाटील, रामविजय बुरुंगले अश्या अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. माजी मंत्री व आमदार कुटे यांनी पंधरा वर्षात प्रथमच एक स्वतःचा नियम फक्त या लग्नासाठी मोडला. ते लग्नात भाषण करत नाहीत मात्र इथं आवर्जून त्यांनी संभाषण साधत या विधायक विवाहाचे कौतुक केले, प्रताप – पदमजाच्या हिमतीला दाद दिली अन मारोडे कुटुंबाच्या आदर्शाला अभिवादन केले.
सालईबनच्या पर्यावरण कार्यात आमदार कुटे यांचा तन -मन- धनाचा सहयोग असतो हे विशेष. त्यांच्या पुढाकारातून येथे जैव विविधता प्रशिक्षण शिबीरासांठी पक्के सभागृह बांधण्यात आले आहे. तर खासदार प्रतापराव जाधव यांनीही या वास्तूसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
पर्यावरणासाठी दान
बँड ऐवजी सनई चौघडा ठेवण्यात आला. डीजे, डान्स, फटाके, घोडा असा खर्च टाळून सालईबनातील पर्यावरण कार्यासाठी २५ हजार रुपयांचा धनादेश नवपरिणीत जोडप्याने तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल पवार, कोषाध्यक्ष अविनाश सोनटक्के, डॉ.राजेश मिरगे यांना जाहीरपणे प्रदान केला. तर नवरदेवाच्या आणखी एका जवळच्या नातेवाइकाने इथे होणाऱ्या युवकांच्या शिबिरासाठी २५ हजार निधी घोषित केला.
अश्या अद्भुत सोहळयात “चांगला प्रताप ” घडला. अनेक उपक्रमशील बाबी सांगायच्या टाळून लग्नाची गोष्ट आटोपती घेतो पण शेवटच्या दोन ओळी वाचून घ्याच.
समारोप
ज्या लग्नाची एवढी चर्चा झाली त्याचा कर्ता-धर्ता या सोहळ्यात समोर समोर न मिरवता कुठंतरी धावणाऱ्या मंडळीत दिसत होता, तो माणूस म्हणजे मंजितसिंग. हा अद्वितीय सोहळा “निर्विघ्न” पार पडला पाहिजे म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून ते सतत नियोजन, चर्चा, अखंडपणे कामात व्यस्त होते. दुसऱ्यांना बंधनात अडकविणारा हा मित्र स्वतः मुंजा ( बिनलग्नाचा ) असला तरी मात्र त्याचा सालईबनातील झाडांचा परिवार सतत वाढतच चालला आहे.