भोर : महान्यूज लाईव्ह
माणिक पवार
‘ राज्यात असो अथवा वेल्ह्यात जी काही विकासकामे झालेली आहेत ती महाविकास आघाडीमुळेच झालेली आहे. त्यामुळे एकमेकांची उणीदुन काढून गैरसमज करून घेऊ नका ‘ असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला. तसेच वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तोरणागडाच्या विजपुरवठ्याचे उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार मेळाव्यात बोलत होते. यावेळी जिल्हा दुध संघाचे संचालक व भाजपचे जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष भगवान पासलकर व कॉग्रेसच्या माजी सभापती संगीता जेधे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळाली आहे.
यावेळी आमदार अशोक पवार, दिलीप मोहिते, जिल्हा बँकचे अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णूकाका हिंगे, विकास दांगट, महिला जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, संचालक रेवणनाथ दारवटकर, भालचंद्र जगताप, दूध संघाचे उपाध्यक्ष वैशाली गोपालघरे,
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, वेल्हा तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, भोरचे सभापती लहूनाना शेलार, रामनाना कोकाटे, प्रदीप मरळ, विकास पासलकर, उद्योजक बाळासाहेब पासलकर, सुप्रिया मांगडे, शंकर भुरूक, चंद्रकांत बाठे, प्रमोद लोहकरे, निर्मला जागडे, सुधिर रेणुसे, प्रदिप सुनिल राजीवडे, गोरक्ष भुरूक, संदिप खुटवड, रमेश शिंदे, भट्टीचे सरपंच हरिभाऊ कोकाटे,जीवन कोकाटे, बबन लोहकरे, दिलीप जाधव, माऊली कांबळे, तानाजी पासलकर, दत्ता निढाळकर, दत्ता भडाळे, रवीआप्पा कोकाटे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, वेल्हे येथील प्रशासकीय इमारत कोठे व्हावी यावर वाद न करता जनतेच्या फायद्याची जी जागा आहे तेथे करावी. भगवान पासलकर व इतरांनी पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. ह्याचा उपयोग येणाऱ्या निवडणूकात होणार असल्याचे सांगत कोकणाला जोडणारा मढेघाट, गुंजवणी धरणग्रस्तांचे तसेच इतर अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका करण्याबाबत राज्य सरकार आता निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमच्या पॅनलमध्ये जे असतील त्यांनीच उमेदवारी अर्ज ठेवावेत असा इशारा त्यांनी दिला.
जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर म्हणाले, पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढणार आहे. कार्यकत्यांनी एकजूटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. रणजित शिवतरे यांनी वेल्हे तालुक्यात होणारी विकासकामे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून झाली असल्याचे सांगितले.
तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संतोष रेणूसे यांनी राजगड प्रमाणे तोरणा किल्यावर रोप वे प्रकल्प मंजूर केल्यास पर्यटन वाढून वेल्हे तालुक्याचा विकास अधिक होणार असल्याचे सांगितले.
पक्षप्रवेश केलेल्या भगवान पासलकर व संगीता जेधे यांनी तालुक्यातील होणारी अधोगती दूर करण्यासाठी आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर सत्ता येण्यासाठी एकदिलाने काम करणार असून वेल्हे तालुक्यात राष्ट्रवादी झेंडा फडकणार असल्याची ग्वाही दिली.