सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ ही म्हण माहित्येय का?… तर मग आणखी एक नवी म्हणही लक्षात ठेवा.. दोघांच्या भांडणात तिसऱ्याची ‘हवा’..! भिगवण येथील ट्रामा सेंटरमध्ये कोविड सेंटर उभारल्यानंतर राष्ट्रवादीने राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते उदघाटन ठेवले होते, तत्पूर्वीच त्याचे उदघाटन भाजपने उरकले होते.. अर्थात ती कोरोनाची पहिली लाट होती…
आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बावड्यात अमेरिकन इंडिया फाऊंडेशनने दिड कोटींचा ऑक्सिजन प्लॅण्ट सीएसआर निधीतून दिला आहे… तो जन्मभूमी म्हणजे गावातच असल्याने तो येथे उभारण्यासाठी आपणच पाठपुरावा केला असे जिल्हा परीषद सदस्या अंकिता पाटील यांचे म्हणणे होते, म्हणून त्यांनी सकाळी त्या प्लांटचे उदघाटन केले.. तर सीएसआर निधीसाठी आम्ही पाठपुरावा केला, त्यांचा काय संबंध? अशी प्रतिक्रिया देत राज्यमंत्री भरणेमामांनी दुपारी त्याचे उदघाटन केले…!
शनिवारी दुपारी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी बावड्यातील ऑक्सिजन प्लॅण्टचे उदघाटन केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः बावडा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी दीड कोटी रकमेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी निधी मिळवला असे सांगत, जनतेची दिशाभूल विरोधक करीत आहेत, नारळ फोडायचेच असतील, तर मी नारळ उपलब्ध करुन देतो असा टोला, त्यांनी जो यापूर्वी हर्षवर्धन पाटील यांना लगावला होता, तो आता त्यांनी त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांना लगावला.
भरणे म्हणाले की, हा निधी कुठून मिळाला, कसा मिळाला याचा मागमूसही विरोधकांना माहिती नाही. मी आजवर कधी जनतेच्या हिताच्या कामात राजकारण केले नाही, मात्र तालुक्यातील जनतेची जर कोणी दिशाभूल करीत असेल तर त्यांना जाब विचारल्याशिवाय तालुक्याची जनता राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
बावडा येथे झालेल्या या कार्यक्रमास माजी सभापती प्रशांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, माजी तालूकाध्यक्ष उमेश घोगरे, जेष्ठ नेते दत्तात्रय घोगरे, नवनाथ रूपनवर, विजय घोगरे, बाळासाहेब कोकाटे, तुकाराम घोगरे, सुरेश शिंदे, विद्या घोगरे, शितल कांबळे, अजित टिळेकर, पांडुरंग कांबळे, नागेश गायकवाड, जगनेश कांबळे यांच्यासह बावडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सकाळी केले अंकिता पाटील यांनी उदघाटन..!
दुसरीकडे बावड्यातीलच या प्लांटचे जिल्हा परीषद सदस्या अंकिता पाटील यांनी शनिवारी सकाळी उदघाटन केले. यावेळी त्यांनी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याची प्रतिक्रिया दिली. हा ऑक्सिजनचा प्लॅन्ट येथे कार्यान्वित होत असल्यामुळे, यासाठी केलेल्या पाठपुराव्यास आपणाला यश मिळाल्याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी व्यक्त केली.
बावडा परिसरातील रुग्णांसाठी भविष्यात अडचण येऊ नये तसेच येणाऱ्या तिसऱ्या कोरोना लाटेत गरजू रुग्णांना या ऑक्सीजन प्लॅन्टमुळे फायदा होणार आहे व एकाही रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू होणार नाही.असे सांगत पाटील यांनी बावडा ग्रामीण रुग्णालयासाठी हा ऑक्सीजन प्लॅन्ट दिल्याबद्दल इंडिया-अमेरिकन फाउंडेशनचे आभार व्यक्त केले.
यावेळी बावडा ग्रामपंचायतचे सरपंच किरण पाटील, उपसरपंच नीलेश घोगरे, ग्रा.पं.सदस्य दादा कांबळे, मुनीर आतार,डॉ.विनोदकुमार घोगरे, डॉ.हिना काझी, अनिल कांबळे, शशिकांत जाधव, सचिन सावंत, ग्रामविकास अधिकारी अंबिका पावशे आदींसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
या सगळ्या गडबडीत जनहितासाठी म्हणून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सीएसआर निधी देऊन कोरोनाच्या काळात खूप मोठा हातभार लावलेल्या अनेक कंपन्या पुढे येत असताना त्यांच्या निधीवरून राजकीय लोकांमध्ये जर वाद निर्माण झाला तर त्यांनी काय करायचे? हा प्रश्न मात्र नव्याने उपस्थित झाला आहे. त्यामुळेच काल दोघांनीही उद्घाटन केली.. त्यावेळी हा सीएसआर निधी देणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी दोघांच्या वेळी उपस्थित होते.. त्यांनी चकार शब्द काढला नाही…! मात्र ‘हवा’ त्यांची होती आणि तिच्या पालकत्वाची ‘भांडणे’ मात्र दोघांत झाली..!