सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
स्थळ – इंदापूरचा बाबा चौक.. वेळ दुपारी दोनची.. तो आला..त्याने मोठ्याने बोंब मारली.. आतड्याला पिळ पडेपर्यंत तो ओऱडला.. भडभडून आल्याने त्याला काय बोलावे हे कळेना.. त्याने पिकअप जीपमधून ढोबळी मिरची बाहेर काढली.. इतस्ततः पसरली.. घरातले कोणीतरी हिरावल्यासारखे तो मोठमोठ्याने रडू लागला.. गेल्या अठरा वर्षात कधी झाला नाही, असा भाजीपाला उत्पादकाचा हिरमोड त्याच्या रुपाने लोक पाहत होते.. झगडेवाडीच्या बळीराजाने आज इंदापूरच्या चौकात भरदिवसा मारलेली ही बोंब बागायती पट्ट्यातील उद्याच्या बळीराजाच्या आत्महत्यांचा सांगावा घेऊन आली होती.. अंगावर काटा आणणारा हा प्रसंग आज दुपारी इंदापूरात घडला.. मात्र उपस्थितांच्या काळजातही चर्रकन एक मोठा ओरखडा उमटवून गेला..!
याचा व्हिडिओ येथे पहा; अथवा महान्यूज लाईव्ह यूट्यूब, फेसबुक पेज वर वर पाहू शकता.
पावसाने झोडपले, राजाने मारले तर दाद कोणाकडे मागायची? अगदी अशीच स्थिती सध्या आहे. विशेष म्हणजे आता राज्यात शेतकऱ्यांच्या पोरांचे म्हणवणारे सरकार सत्तेवर आहे आणि शेतकरी मात्र कधीचा उघडा पडला आहे.. गेल्या अठरा वर्षात कधीही झाली नव्हती, एवढी भाजीपाल्याची माती आता झाली आहे.
आज इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी येथील शेतकऱ्याने आणलेली ढोबळी मिरची फक्त दोन रुपये किलोने दर मिळाला म्हणून बाबा चौकात अक्षरशः पसरवली.. त्याने अत्यंत कष्टाने रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या या ढोबळी मिरचीचा मातीमोल केलेला भाव पाहून त्याने मोठमोठ्याने बोंब मारली.. झगडेवाडीचा खंडू मारुती राजगुरू आणि त्याचे वडील उघड्या डोळ्यासमोर हा हिरव्या सोन्याचा चिखल पेरत होते. आणि या राज्यातल्या, केंद्रातल्या सरकारांचा मूक पंचनामा करीत होते..!
आज राजगुरू यांनी बाजार समितीत ढोबळी मिरची लिलावासाठी आणली होती. त्याकरीता काल व आज सकाळी त्यांनी रोजगारावर महिला कामाला लावल्या होत्या. महावितरणने वीज कापली, म्हणून जनरेटर, डिझेलचा खर्च देऊन त्याने पाणी दिले आणि ही ढोबळी मिरची आपल्या आयुष्यात सोनेरी स्वप्न पेरेल असा आशावाद ठेवून खर्च केला.
आज बाजारात पोचल्यावर व्यापारी वृत्तीने या त्याच्या स्वप्नाचा पार चुराडा केला. मग मात्र प्रचंड निराशा घेऊन तो आणि त्याचा बाप इंदापूर शहराच्या चौकात आले आणि त्यांनी जीपमधील ढोबळी मिरची बाहेर काढून रडत रडत ती इतस्ततः पसरली आणि ज्यांना हवी त्यांनी फुकट न्या असे सांगितले. त्याचवेळी मंडईत मात्र हीच ढोबळी मिरची वीस रुपये किलोने विकली जात होती. तेथे फुकटच्या ठिय्यावर बसलेला विक्रेता घाम न गाळता २ रुपयांच्या मिरचीचे वीस रुपये करतानाही अनेकांनी पाहिला..
कांद्याला दर नाही, मिरचीला नाही. काकडीला नाही… अरे काय लावलंय, आता आम्ही खरंच आत्महत्या करायच्या का असे म्हणत खंडू राजगुरू या युवकाचे वडील सांगू लागले आणि खंडू धाय मोकलून रडू लागला. त्याला पोलिस समजावून सांगू लागले, मात्र बिचाऱ्या पोलिसांना काय माहिती? .. त्याने दिवस नाही, अगदी तास, सेकंद मोजून त्या मिरचीवर एक रोगाट अळी येणार नाही, देठाची पाने मुरडणार नाहीत यासाठी किती कष्ट घेतले होते?
त्या मिरचीला अवघे पाचशे रुपये मिळाले, त्यात कामावर रोजंदारीवरील महिलांचा सोडा, जी जीप आणली, तिचे भाडेही देता येणार नव्हते. अशावेळी त्या शेतकऱ्याला काय वाटले असेल याचा विचार मात्र किती जणांनी केला असेल कोणास ठाऊक? कधीकधी लाल चिखल नावाचा असाच एक धडा पाठ्यपुस्तकात आजच्या प्रौढावस्थेत असलेल्यांनी वाचला होता. मात्र आज इंदापूरात याची देही याची डोळा हिरवा चिखल मात्र रस्त्याने ये जा करणाऱ्यांनी नक्कीच पाहिला.. !











