सोलापूर : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र केसरी अप्पालाल शेख यांचे आज दिर्घकालीन आजाराने सोलापूर येथे निधन झाले. सम १९९१ मध्ये राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारे अप्पालाल शेख महाराष्ट्रातील मल्लांसाठी मार्गदर्शक होते.
एकाच कुटुंबात तीन-तीन महाराष्ट्र केसरी असणारे हे कुटुंब उभ्या महाराष्ट्रासाठी दिपस्तंभाप्रमाणे आहे. कोणत्याही मल्लाला चित करणारे अप्पालाल अखेरच्या काळात मात्र मधुमेहाने व मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होते. मधुमेहानेच त्यांना चित केले. अखेरच्या काळात आर्थिक विवंचनेने त्यांना ग्रासले होते.
बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) या गावात जन्मलेल्या अप्पालाल यांनी सन १९९३ मध्ये संजय पाटील यांना अंतिम सामन्यात पराभूत करून महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. त्यांचे बंधू इस्माईल शेख, पुतणे मुन्नालाल शेख यांनी महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली. एकाच कुटुंबातील तीन जण महाराष्ट्र केसरी असणारे हे महाराष्ट्रातील एकमेव कुटुंब आहे.
अप्पालाल यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले व सुवर्णपदक मिळवले होते. मध्यंतरी त्यांना मधुमेह व मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रासले. काही महिन्यांपूर्वीच अप्पालाल यांच्या पत्नींचे निधन झाले. गुरूवारी अप्पालाल यांचे निधन झाले.











