राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेंचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सभासदांचा मालकीचा कारखाना असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस पाठविण्याऎवजी आम्ही कारखाना सुरू करण्याबाबत पाठवलेल्या प्रस्तावावर भाष्य करायला हवे होते, मात्र साखर आयुक्तांच्या चौकशीत सर्व सत्य समोर येईल, असे मत भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार यांनी बुधवारी ( दि.25) पुण्यात पत्रकार आणि गुरूवारी दौंड येथे पत्रकार परिषेद घेतली. या पत्रकार परिषदेत थोरात यांनी भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल यांच्या विविध आरोप करीत टिका केली होती.
जिल्हा बॅकेचे दिडशे कोटी थकीत असून त्यांनी थकबाकीची देणी न दिल्याने कारखान्यावर जप्तीची नोटीस पाठवली आहे असे थोरात म्हणाले होते. यावर भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार राहुल कुल म्हणाले की, जिल्हा बॅकेने जप्तीची नोटीस पाठवली आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडे चौकशी करण्यासाठी अर्ज केले आहेत.
मात्र रमेश थोरात हे कारखान्याचे संचालक झाल्यापासून त्यांनी उपाध्यक्ष होऊन सह्यांचे अधिकार जेव्हा स्वतःकडे घेवून कारभार हाती घेतला. तेंव्हा पासून ते आतापर्यंत कारखान्याची चौकशी करायला हवी, म्हणजे सत्य समोर येईल.
भीमा पाटस कारखाना हा सभासद आणि कामगारांच्या मालकीचा आहे.
त्यांच्या हितासाठी आम्ही कारखाना चालू करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र हे करताना अनेक अडचणीचा समाना करावा लागतो. बॅंकेच्या कर्जाबाबत आम्ही बॅंकेकडे कारखाना सुरू करण्याबाबत मदत करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत त्यांनी उत्तर दिले नाही. असे राहुल कुल यांनी सांगितले.