आळंदी : महान्यूज लाईव्ह
कुटुंबाचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी त्या कुटुंबातील महिला आर्थिक सक्षम झाल्या पाहिजेत. महिला आर्थिक सक्षम झाल्यास कौटुंबिक हिंसाचाराला आळा बसेल आर्थिक सक्षमतेमुळेच महिलांना सन्मान मिळेल असे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले.
मानिनी फाऊंडेशन आणि आपला आवाजच्या वतीने पोलिस आयुक्तालयात पोलिस कर्मचारी व अधिका-यांना बारा हजार मास्क वाटप करण्यात आले. यावेळी आयुक्त कृष्णप्रकाश बोलत होते. यावेळी मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण, डॉ. अशोक पगारीया, आपला आवाजचे संपादक अतुल परदेशी, आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगिता तरडे, निशिता घाडगे आदींसह महिला भगिनी उपस्थित होत्या.
आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, पुरुष नाही तर पुरुषवादी मानसिकता हे महिलांच्या शोषणाचे कारण आहे. एखादी स्त्री देखील पुरुषवादी मानसिकतेची असू शकते. यावर स्त्री-पुरुष भेदभाव न करता त्यांना समान दर्जा, समान वागणूक आणि समाजात सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने मानिनी फाउंडेशन महिलांना शारीरिक, मानसिक सामाजिक आणि आर्थिक सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय काम करीत आहे. याचे कौतुक आहे.
प्रास्ताविक करताना संयोजिका व मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण म्हणाल्या की, शिक्षणाबरोबरच महिलांची उद्यमशीलता उपयोगात आणून त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मानिनी फाऊंडेशन काम करीत आहे. फाऊंडेशनचे स्थापना पिंपरी चिंचवडमध्ये झाली. परंतू महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड, डेहराडून येथेही संस्थेचा कार्यविस्तार झाला आहे असेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.











