राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेले मोबाईल हे शासनाकडे परत केले आहेत. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी दौंड पंचायत समितीसमोर गुरूवारी ( दि.26) ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी तब्बल 308 मोबाईल दौंड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास कार्यालयात शासनाला जमा केले आहेत.
राज्य शासनाने राज्यातील राज्यातील 1 लाख 5 हजार 592 अंगणवाडी सेविकांना 2019 मध्ये शासकीय कामासाठी म्हणजे विद्यार्थी तसेच लाभार्थ्यांची नावे ,हजेरी, उंची, गर्भवती मातांची माहिती,पोषण अभियान अंतर्गत माहिती बनविणे, अशा विविध कामांची माहिती भरण्यासाठी शासनाने हे मोबाईल अंगणवाडी सेविकांना दिले होते
पोषण अभियान अंतर्गत माहिती बनण्यासाठी हे मोबाईल दिले होते. मात्र हे मोबाईल कमी क्षमतेचे व वारंवार हॅंग होत आहेत. शासनाने हे मोबाईल निकृष्ट दर्जाचे आणि सदोष झालेले मोबाईलचे वाटप केले असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी यावेळी केला.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोबाईलचे नेटवर्क संथगतीने सुरू आहे. या मोबाईल मध्ये रॅम कमी असल्याने काम करताना विलंब लागतो. या मोबाईलची क्षमता (रॅम ) कमी असल्याने सातत्याने मोबाईल हँग होत असल्याने अंगणवाडीसेविकांना काम करताना अडचणी निर्माण होत आहेत.
परिणामी त्यामुळे वैयक्तिक मोबाईल मधून त्यांना ही माहिती भरावी लागत आहे. मोबाईल मध्ये क्षमता कमी आहे तसेच नवीन सॅाप्टवेअर डाउनलोडिंग करताना इंग्रजी भाषेत असल्याने अनेक अंगणवाडीसेविकांना ही भाषा लवकर अवगत होत नाही. या सॉफ्टवेअरमध्ये मराठी भाषेचा वापर करावा अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी यावेळी केली. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्यमहासचीव शुभा शमीम यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी दौंड तालुका अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा रेखा शितोळे, उपाध्यक्षा मिना कुल (जगताप ), किरण जांबले, सचिव सुवर्णा शितोळे, नंदा कोकरे, संगिता सोनवणे, लता झोपे, उषा सोडनवर, कुंदा भोसले, लतिका शिंदे आदिंसह तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, दौंड पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी के. एस. धुमाळ म्हणाले की,अंगणावाडी सेविकांनी 308 मोबाईल दिले आहेत. ते आम्ही ताब्यात घेतले असून वरिष्ठ अधिका-यांना याबाबत कळविले आहे.











