अजित पवार यांचे बैलगाडी शर्यतीवरून सुरू असलेल्या राजकीय वादावर भाष्य
बारामती : महान्यूज लाईव्ह
सध्या काहीजण स्टंटबाजी करतात, मात्र त्यांचंच सरकार मागील पाच वर्षात होतं, त्यांना कोणी अडवलं नव्हतं..आताही त्यांचंच केंद्रात सरकार आहे. मग का सुरू करीत नाहीत शर्यती? केवळ स्टंटबाजी करायची व लोकांची दिशाभूल करायची हे सोडून द्या अशी टिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, बैलगाडी शर्यत चालू व्हावी अशीच राज्य सरकारची भुमिका आहे. पण सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे परवानगी देता येत नाही. सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला महत्व आहे. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला.. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसे पाहिल्यास हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आहे. संसदेतही अनेकदा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
भाजपवाल्यांकडून आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. वास्तविक कोणत्याही पक्षाची किंवा पक्षविरहीत व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल.. गुन्हे दाखल केले जातील. चुकीचे कोणतेही कृत्य चालणार नाही. लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी त्याचे पालन केलं.. कारण ते सर्वांच्या हिताचं होतं. मात्र आम्हीच नियम करायचे आणि आम्हीच स्पर्धा घेवून नियम मोडायचे हे आमच्या रक्तात नाही.
मंदिर उघडण्याबाबतच्या प्रश्नावर पवार म्हणाले, मंदिरे उघडण्याबरोबरच सगळीच दैनंदिन व्यवस्था सुरळीत सुरू करण्याची आमची इच्छा आहे. मात्र ७०० टनांपेक्षा अधिक ऑक्सिजनची गरज राज्यात पुन्हा भासली तर लॉकडाऊन करावे लागेल. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. कोरोनाची तिसरी लाट येऊ नये असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर मंदिरात लोकांना दर्शन घेता यावे अशीही आमची भूमिका आहे.
मात्र जिथे जिथे गर्दी होत आहे, तिथे काहीच दिवसानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय असे दिसून येत आहे. मध्यंतरी वाखरी ते पंढरपूरदरम्यान काही किलोमीटर पायी चालण्यासाठी सरकारने परवानगी दिली. मात्र त्यानंतरच्या काळात पंढरपूरमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. आजही काही तालुक्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या चिंताजनक आहे.