बारामती परिसरातील विकास कामांची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला कोरोना परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवडयापेक्षा कोरोना बाधीतांची संख्या खूप वाढली आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना बारामतीत ती वाढण्याचे कारण काय? प्रशासनाने यातील उपाययोजनांचा नव्याने आढावा घेऊन कठोरपणे कार्यवाही करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना केली.
प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. कोणीही हलगर्जीपणा करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. बारामती तालुक्यात सुरु असणारी विकास कामे दर्जेदार करण्याबरोबरच सर्व विभागांनी समन्वय राखत विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बारामती परिसरातील विकासकामांच्या पहाणी दौऱ्यानंतर येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव, पंचायत समिती सभापती निता फरांदे, उपसभापती रोहित कोकरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव आदी उपस्थित होते.
प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता ढेपे, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता राहूल पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई ग्रामिण रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के आदी विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना, संसर्गाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, अँटिजेन तपासणी, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सीजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह तालुक्यात मागील आठवडयापेक्षा कोरोना बाधींतांचा चढता आलेख दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच कोणीही हलगर्जीपणा करु नये. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव जादा आहे. संसर्ग कशामुळे वाढला याची माहिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना राबवा. टेस्टींग व सर्वेक्षणावर भर देणे आवश्यक आहे. हॉटस्पॉट ठिकाणे प्रतिबंधीत करण्यात यावीत, जेणे करुन कोरोना संसर्गाची साखळी तोडणे शक्य होईल. कोरोना संसर्ग इतर ठिकाणी कमी होत आहे. बारामतीमध्ये का कमी होत नाही त्याची कारणे शोधा व त्यावर उपाययोजना राबवा असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कऱ्हा नदी सुधार प्रकल्प, मेडद येथील रिंग रोडची पाहणी करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विकासकामांबाबत योग्य त्या सूचना देऊन विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.
या बैठकीपूर्वी आदिवासी विकास विभाग घोडेगाव प्रकल्प अंतर्गत बारामती तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या कुटुंबाना खावटी अनुदान योजनेअंतर्गत खावटी धान्य किटचे सहा लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
सहारा फाऊंडेशन बारामती यांच्या वतीने गरजू व होतकरु महिलांसाठी 62 शिलाई मशीनचे वाटप एकता इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करण्यात आले. यावेळी पी.ए. इनामदार, मुस्लीम बँकेचे चेअरमन, आयोजक परवेज हाजी कमरुद्दीन सय्यद, आल्ताब हाजी हैदरभाई सय्यद, पदाधिकारी, लाभार्थी व अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांची भूमीपूजन व उद्धाटन
बारामती नगरपरिषदेच्या वतीने सर्वे नं. 220 येथे दुर्गा टॉकिजच्या समोर कमर्शियल कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरु करण्यात येत आहे. या ठिकाणचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेते सचिन सातव यांच्यासह नगरपरिषदेचे सदस्य, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मौजे मळद येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.