बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत तिसऱ्या कोरोनाच्या लाटेसाठी अभूतपूर्व काळजी प्रशासनाकडून घेतली जात असून बारामतीत राज्यातील पहिले पोर्टेबल कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. ज्या सेंटरची कधीही, कोठेही उभारणी करता येऊ शकणार आहे. जिथे रुग्ण अधिक, तिथे ते हलवता येणार आहे.
बारामतीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त आढळले. या तालुक्यात बाहेरील तालुक्यांतून, जिल्ह्यांमधून हजारो रुग्णांनी उपचार घेतला. यामुळेच तिसऱ्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच काळजी घेण्यास सुरवात केली असून तालुक्यात आता पुन्हा रुग्णसंख्याही वाढू लागली आहे.
अशा स्थितीत पोर्टेबल कोविड सेंटरची संकल्पना पुढे आली आहे. ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, अशा भागात तातडीने हे सेंटर उभारले जाऊ शकते. या सेंटरमध्ये सर्व सुविधा असून ते सेंटर कधीही कुठेही हलविता येणार आहे, तशी त्याची रचना करण्यात आली आहे.
आज बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सेंटरचे उदघाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी या सेंटरची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.