बारामती : महान्यूज लाईव्ह
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाच्या सदस्य असलेल्या कलाकारांसह अखिल भारतीय मराठी नाट्य परीषद, लोककला लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, बालगंधर्व परीवार यांच्या माध्यमातून कोरोना काळात कलाकारांच्या मदतीसाठी केलेल्या कामकाजाची दखल थेट लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने घेतली. इंदापूर तालुक्यातील सणसरचे सुपुत्र मेघराज राजेभोसले यांची नोंद या संस्थेने जागतिक विक्रमात केली आहे.
हा इंदापूर व बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे. मेघराज राजेभोसले यांनी कोरोना काळात अडचणीत आलेल्या कलाकारांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तूंपासून ते काम उपलब्ध करून देण्यापर्यंत केलेल्या कामकाजाची यामध्ये दखल घेण्यात आली आहे.
मेघराज राजेभोसले यांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या लोककलावंतांसह दूरचित्रवाणी, रंगभूमीशी संबंधित कलाकारांना एकत्र आणले. त्यांच्या शाश्वत कामासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण किंवा रंगभूमीवरील कलाकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
कोरोनाच्या काळात पूर्णतः बंद असलेल्या या क्षेत्रातील कलाकारांची परवड झाली होती. त्यांना मदतीसाठी सीएसआरच्या माध्यमातून अनेक कंपन्या, स्वयंसेवी संस्था, दानशूरांची मदत त्यांनी घेतली व मदत उभारली. त्यांच्या याच कामाची दखल जागतिक विक्रम संस्थेने घेतली. विल्यम जेझलर यांनी देखील भोसले यांच्या कामाचे कौतुक केले.
यासंदर्भात मेघराज राजेभोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या जागतिक स्तरावरच्या नोंदीमुळे जबाबदारी वाढल्याचे सांगून सामाजिक कामासाठी हुरूप वाढल्याचे सांगितले.