सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
टीव्हीवर एका मालिकेची चर्चा सुरू आहे, ‘ती परत आलीय..!’.. आणि इंदापुरात ही अशीच चर्चेला सुरुवात झालीय, ‘तो परत आलाय‘..! हो तोच तो, ज्याला इंदापूरकर सिंघम म्हणतात…! श्रीकांत पाटील यांनी इंदापूर तालुक्याच्या तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मॅरेथॉन बैठक घेतली.
अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर त्यांनी पोलिस पाटलांची संध्याकाळी बैठक घेतली आणि सांगितले, उद्यापासून तुम्ही दररोज दिवसातून एकदा तरी फिटनेसची ऍक्टिव्हिटी करायची…! या गावचा पोलीस पाटील फिट गाव कायदा आणि सुव्यवस्थेत राहील हिट! झाले… हुकुमाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस पाटील कामाला लागले..
आज सकाळपासून कोणी सायकल वर, कोणी धावताना, कोणी चालताना तर कोणी योगासने करताना लोकांना दिसले.. आणि तहसीलदारांना दिसण्यासाठी पोलीस पाटील आपले फोटो अपलोड करु लागले…! आज सकाळपासून इंदापूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील व्यायाम करीत होते.
श्रीकांत पाटील यांनी आपल्या गावात आपले सरकार ही योजना राबवण्याचे ठरवले दिसते. कारण त्यांना पोलीस पाटलांकडून गावात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची अचूक बित्तंबातमी हवी आहे. म्हणजे त्या गावात शासकीय कर्मचारी, अधिकारी येतात, येत नाहीत याची माहिती मिळेल. आज नेमके गावात काय झाले? याच्या पासून प्रत्येक घडामोडीची अचूक माहिती पण होईल, त्यामुळे त्या घडामोडी नोंदवण्याच्या सूचना श्रीकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
जेणेकरून या गावातील कायदा आणि सुव्यवस्थेची, सरकारी कामकाजाची इत्थंभूत बातमी तालुक्याचा प्रमुख म्हणून तहसीलदार पर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचेल. यामध्ये कोणताही पक्षपातीपणा होणार नाही. तसेच कोणीही राजकीय व्यक्ती, सामाजिक संघटना अथवा इतर कोणी वेगळ्या किंवा अवांतर माहिती देऊ शकणार नाहीत.
पहिल्याच बैठकीत तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी पोलिस पाटलांवर कायद्याची आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असते हे पटवून दिले. मात्र कोणीही अवैध धंद्याशी संबंधित आढळून आला, तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा देखील दिला. आपण व्यवस्थित असू, तर प्रशासनावर आपला अंकुश राहील असे त्यांनी पोलिस पाटलांना समजावत तहसीलदाराची ताकद म्हणजे गावचा पोलीस पाटील हे पोलिस पाटलांना समजावून सांगितले आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागा केला.