माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर : तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद साबणे यांनी विविध सामाजिक संघटनांना कोविड सेंटर साठी मदतीचे आवाहन केले होते.
ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष राजीव केळकर यांनी बाल कोविड वार्डसाठी ध्रुव संस्थेच्या वतीने वार्ड दत्तकच घेण्यासाठी विंनती केली. तत्कालीन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी वार्ड सुशोभीकरण व आतील वार्ड रचना करण्यासाठी परवानगी देण्यास सुचवले.
ध्रुव प्रतिष्ठान च्या माध्यमातून 1ते 10 वयोगटातील मुलांची आवड लक्षात घेऊन व मुलांची हॉस्पिटलची भीती घालविण्यासाठी विशिष्ट पद्धतीने बाल कोविड वार्डची रचना केली आहे. त्यामध्ये कार्टून, स्पोर्ट्स सह 42 इंची टीव्ही, सर्व बैठे खेळ, त्यामध्ये कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, सापशिडी, चित्रकला साहित्य, टेडीबियर, छोटया भीम सारख्या बाहुल्या, गोष्टीची पुस्तके, साउंड सिस्टीम, सर्व भिंती कलरफूल मध्ये कार्टून चित्र रंगवली असून संभाव्य कोरोना ग्रस्त मुलांना पौस्टीक आहार उपलब्ध ठेवला जाणार आहे.
ध्रुव प्रतिष्ठानने तयार केलेल्या बाल कोविड वार्डचे आज उपजिल्हा रुग्णालयाकडे भोरचे तहसीलदार सचिन पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या हस्ते फित कापून हस्तांतरण करण्यात आले.
या प्रसंगी डॉ आनंद साबणे, डॉ लिंगेश्वर बिरूळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल मुऱ्हे, रवी कंक, सचिन देशमुख, निलेश खरमरे, किरण आंबीके, पांडुरंग शिवतरे, राहुल खोपडे उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते रुग्णालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक करताना लहान मुले यांना कोणत्याही आजाराची बाधा होऊ नये यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण दुर्दैवाने मुले बाधित होऊन हॉस्पिटलमध्ये आलीच, तर आनंददायी उपचार घेऊन घरी जातील, यासाठी या बाल कोविड वार्डची रचना केली असून यासाठी भोरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व रुग्णालय अधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचे राजीव केळकर यांनी सांगितले.