बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीमध्ये एकदम कमी झालेली कोरोनाची रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या आठवड्यात कोरोनाची रूग्णसंख्या सरासरी साठीच्या वर सलग राहिल्याने ही चिंता वाढली असून, दोन दिवसात कोरोनावर बारामतीत उपचार घेत असलेल्या 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने पूर्ण मोकळीक दिलेली आहे, म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नका. बारामतीकर; कोरोना चे नियम पाळा.
बारामतीतील रुग्णसंख्या गेल्या सात दिवसात अशीच कायम चढती राहिली आहे. 13 ऑगस्ट रोजी बारामतीत 42 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले होते. 15 ऑगस्ट रोजी रविवारची सुट्टी असल्यामुळे तसेच शासकीय सुट्टी असल्यामुळे ही रुग्ण संख्या 16 वर घसरली होती. मात्र 16 ऑगस्ट रोजी हीच संख्या 78 वर पोचली. 17 ऑगस्ट रोजी ही संख्या 71 वर राहिली, 18 ऑगस्ट रोजी ती 64 वर होती, तर 19 ऑगस्ट रोजी दिवसभरात झालेल्या तपासणीत आढळलेली रुग्ण संख्या 75 एवढी आहे.
आजपर्यंत बारामतीत मागील दीड वर्षात मिळून 27944 रुग्ण झाले असून आत्तापर्यंत 26 हजार 887 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मागील दोन दिवसांमध्ये बारामतीत उपचार घेत असलेल्या नऊ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील सहा रुग्णांचा मृत्यू आज दिवसभरात झाला असल्याची माहिती नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही आज (ता.२०) दिवसभरात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती दिली. यातील 3 जण बारामती तालुक्यातील तर 3 जण बाहेरील तालुक्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीत लसीकरणाचा वेगही उपलब्ध असलेल्या लसीनुसार वेगात असून बारामतीत गावोगावी प्रशासनाने व आरोग्य खात्याने युद्धपातळीवर रॅपिड चाचण्यांची शिबिरे आयोजित केली आहेत. त्यामुळे दररोज कोणत्या ना कोणत्या गावात कोरोनाच्या चाचण्या होत असल्याने कोरोनाची रुग्ण संख्या अधिक दिसत आहे, मात्र तरीदेखील बारामतीतील बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता लोकांनी स्वतःहून कोरोना चे नियम पाळण्याची आवश्यकता आहे.