बारामती : महान्यूज लाईव्ह
काल (ता.१८) संपूर्ण दिवस बारामतीत एक नाट्य घडत होते.. एरवी सर्वांनाच आपल्या बोटावर नाचविणाऱ्या रेल्वेला बारामतीकरांनी नाचवले.. कायद्याचा धाक दाखवत बेकायदेशीर काम सुरू ठेवणाऱ्या रेल्वेला काल दिवसभरात बारामती नगरपरीषदेने अभिनव पध्दतीने जाग्यावर आणले. या टप्प्यातील कार्यक्रमात रेल्वे प्रशासनाचा अभेद्य सामना करणाऱ्या गटनेते सचिन सातवांनी दिवसभर बारामतीची खिंड लढवली.. अखेर फासे बारामतीच्याच बाजूने पडले, मात्र या घडामोडीत एक नाट्यही घडले..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या सेवा रस्त्याच्या कामाबाबत बारामती नगपरीषदेकडूुन रेल्वेकडे पाठपुरावा सुरू होता. इतर ठिकाणचा रस्ता अनेक बांधकामे पाडून तयार करण्यात आला. मात्र रेल्वेचे कामच वेगळे असते
हे ऐकत नगरपरीषद रेल्वेस्थानकाच्या हद्दीतील बंद असलेला रस्ता सुरू करण्यासाठी ना हरकत मिळेल या अपेक्षेवर प्रतिक्षा करीत राहीली.
काही दिवसांपूर्वी येथे अपघात झाला आणि बऱ्याच दिवसा्ंपासून बंद असलेल्या या कामासाठी तातडीने पाठपुरावा सुरू झाला. मात्र रेल्वे प्रशासन कासवगती काही सोडत नव्हते. मग काल (ता.१८) बारामती नगरपरीषदेने पाच वर्षांपूर्वी केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला.
बारामतीत रेल्वेचा मालधक्का स्थानकाशेजारीच आहे. येथे दररोज शेकडो मालट्रक येऊन मालवाहतूक रेल्वेच्या मालाची वाहतूक करतात. वस्तुतः शहरात जड वाहने आणू नयेत असा ठराव नगपरीषदेने केला आहे. मात्र व्यावसायिक गणित, तसेच रेल्वेशी असलेले नाते व इतरही कार्यबाहुल्यामुळे आजवर या गोष्टीकडे कोणीच लक्ष दिले नव्हते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी अनेकदा पाठपुरावा करून या सेवा रस्त्याचा तिढा सोडविण्यासाठी अगदी मंत्र्यांना अनेकदा भेटल्यादेखील..! मात्र या साऱ्या प्रकरणात शांत असलेल्या रेल्वेला काल बारामतीकरांनी संतप्त होऊन जाग आणली. पाच वर्षापूर्वीच्या ठरावाची अंमलबजावणी करताना मालधक्क्याकडे जाणारा नगपरीषदेच्या हद्दीतील रस्ता जड वाहनांसाठी बंद करून तेथे सात फूट उंचीची कमान बांधली.
त्यानंतर येथे कोणी अनाधिकाराने प्रवेश करू नये यासाठी नगपरीषदेने भक्कम तटबंदी रोवली. यात गटनेते सचिन सातव हे बारामतीकरांच्या वतीने किल्ला लढवित होते. त्यांची अभेद्य भिंत येथे काम करीत होती. सकाळपासूनच त्यांनी येथे ठिय्या मांडला. एकही ट्रक आत न गेल्याने दुपारपर्यंत मालट्रक जागोजागी उभे राहीले. वाहतूकीची कोंडी झाली होती आणि सर्वात महत्वाचे रेल्वेचे काम रखडले होते.
सुरवातीला रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्टाईलने या आंदोलनाचा समाचार घेण्याचे ठरवले. रेल्वेची स्वतंत्र पोलिस यंत्रणा असते, सुरक्षा यंत्रणा असते. पुण्यातील सुरक्षेशी संबंधित एका अधिकाऱ्याने थेट गटनेते सचिन सातव यांना कारवाई करण्याचा इशारा दिला.
त्यावर सचिन सातव यांनी उसळून बारामतीत या, माहिती घ्या आणि कारवाई करा असे ठाम प्रत्युत्तर देतानाच जर तुम्ही आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करीत असाल तर येथे तीन अपघात झाले आहेत, त्याची जबाबदारी तुमची आहे, जड वाहनांना परवानगी नसताना तुमचे मालट्रक शहरातील रस्त्यावरून वाहतूक करीत आहेत, त्यातून अपघात झालेले आहेत, त्याची जबाबदारी तुमची व एकूणच रेल्वे मंत्रालयाची आहे असे सातव यांनी निक्षून सांगितले.
एवढ्यावर न थांबता सचिन सातव यांनी आमचे नेते संयमी आहेत, म्हणून तुमचा रुबाब वाढला आहे, मात्र आता तसे होणार नाही असे सांगत तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी येथे झालेल्या अपघातांची जबाबदारी म्हणून रेल्वेमंत्र्यांवर कारवाईची मागणी करतो असे प्रत्युत्तर दिले.
आधी मी गुन्हा दाखल करणार, कारण आमची कारवाई कागदोपत्री भक्कम पुराव्यानिशी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही रेल्वेच्या हद्दीत नव्हे तर आमच्या नगरपरीषदेच्या हद्दीत थांबून आमच्या नागरिकांच्या जीवाचे रक्षण करीत आहोत, त्यांच्या हितासाठी आम्ही कोणतेही निर्णय घेऊ शकतो असे स्पष्ट केले.
सातव यांनी थेट निर्णायकी इशारा दिल्यानंतर अधिकारी नरमाईची भाषा बोलू लागले. खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधत ही परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आणि पुढे सारेच वातावरण निवळून सेवा रस्त्यासंदर्भात सात दिवसांत ना हरकत प्रमाणपत्र देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.
मात्र त्यानंतरही दिवसभरात सचिन सातव यांनी ठामपणे थांबून केलेल्या आग्रही अंमलबजावणीच्या पध्दतीची शहरात रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. दरम्यान रेल्वेनेही यातील गांभिर्य ओळखून लगेचच आज तातडीची बैठक बोलावली.