सातारा : महान्यूज लाईव्ह
जागतिक वारसास्थळ असलेल्या कासचे पठार गेली दीड वर्षे पर्यटकांविना सुनेसुने आहे.. मागील वर्षी पर्यटकांना कासच्या फुलांचा आनंद कोरोनामुळे लुटता आला नव्हता. यावर्षी मात्र वनविभागाच्या बैठकीत २५ ऑगस्टपासून ऑनलाईन बुकींगद्वारे कासमध्ये पर्यटनाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे नियम पाळून १०० रुपये प्रतीव्यक्ती शुल्क आकारून हा प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी ऑनलाईन बुकींगच करावे लागणार आहे. याखेरीज मार्गदर्शक घेतल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क, वाहन पार्किंगसाठीही जादाचे पैसे मोजावे लागतील. जर कॅमेरा आणला असेल तर त्याचेही शुल्क द्यावे लागणार आहे.
कासच्या संदर्भात वनविभागाच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. या बैठकीस सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, रंजनसिंह परदेशी व सातारच्या कास पठारच्या आजूबाजूच्या सहा गावातील वनसमितीचे पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.