शिरूर : महान्यूज लाईव्ह
दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून मित्राचा खू-न करणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने कुठलाही पुरावा नसताना जलदगतीने तपास करून आरोपीला गजाआड केले असल्याची माहिती पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,रमेश उर्फ कानिफनाथ सावता पांढरकर (वय.४०, राहणार खंडाळे) हे बेपत्ता असल्याबाबत पत्नी अंजली यांनी पोलिस स्टेशन ला बेपत्ता असल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान खंडाळे गावचे पोलिस पाटील यांना त्यांचे पती न्हावरा तळेगांव रोडलगत घाटाजवळ जखमी अवस्थेत पडलेले असल्याबाबत माहिती मिळाल्याने फिर्यादी यांनी समक्ष जाऊन पाहणी केली असता फिर्यादी अंजली यांचे पती यांना डोक्यात दगड घालून चेहऱ्यावर दगड मारून चेहरा विद्रूप केला असल्याचे पाहिले.यावरून पोलिसांनी खु-नाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता रांजणगाव पोलिस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आलेले होते.
दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करत कोणताही पुरावा नसताना मिळालेल्या माहितीवरून आरोपी निष्पन्न केले. हा गुन्हा दादाभाऊ मारुती वाघ (वय.२६, रा.निमगाव दुडे, हल्ली राहणार ढोकसांगवी) याने व त्याच्या नात्यातील अल्पवयीन बालकाच्या मदतीने केला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी ढोकसांगवी येथे सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. आरोपींनी हा गुन्हा दारू पिताना झालेल्या भांडणाच्या कारणावरून राग मनात धरून केल्याचे पोलिसांना सांगितले.
हा तपास गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे,सहायक फौजदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन,अजित भुजबळ, मंगेश ठिगळे, मुकेश कदम, रांजणगाव पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार, तसेच सायबर सेलचे सुनील कोळी, चेतन पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना अवघ्या चोवीस तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.