माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १८ : भोर तालुक्यातुन जात असलेल्या रिंगरोडमुळे शेतीचे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यासाठी केळवडे ते खोपी या अंतरात रिंगरोडसाठी महामार्गाचा वापर झाल्यास सर्वच बाबीत मोठी बचत होऊन विरोध होणार नाही असे मत भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी मांडले असून, रिंगरोड विरोधी कृती समिती व अधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत तसा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
भोर तालुक्यातील रिंगरोड बाधित शेतकरयांच्या भावना अधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व रिंगरोड विरोधी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस आमदार संग्राम थोपटे, रस्ते विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता ए. पी. नागरगोजे, कार्यकारी अभियंता गणेश चौरे, कृती समितीचे अध्यक्ष शामसुंदर जायगुडे, आण्णासाहेब भिकुले, जितेंद्र कोंडे, शांताराम जायगुडे, दिनकर दळवी, केळवडेच्या सरपंच शोभा सोनवणे, शुभांगी इवरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, मुंबई बाजार समिती उपसभापती धनंजय वाडकर यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी व शासनाची देखील बचत होण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी अधिकाऱ्यांसमोर रिंगरोड केळवडे येथुन खोपी (ता.भोर) पर्यंत नेताना सर्व बागायती क्षेत्र आहे.
या प्रस्तावित १४ किलोमीटरचे रिंगरोडचे अंतर पूर्ण वगळून या भागातील रिंगरोडसाठी केळवडेपासुन खोपीपर्यंत महामार्गाचा वापर व्हावा हे अंतर फक्त 5 किलोमीटर आहे असे केल्याने रस्ता उभारणीचा खर्च पूर्ण वाचेल व शेतकऱ्यांची समस्या देखील मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रस्तावाबरोबरच कृती समिती मधील कांबरे व नायगाव येथील सदस्यांनी सासवड गराडे येथुन येणारा रिंगरोड कांबरे, करंदी व नायगाव येथुन जात आहे, या ऐवजी कांबरे येथुन डोंगरातून बोगदा काढल्यास वरवे येथील डोंगरातुन थेट महामार्गावर रस्ता येऊ शकतो. त्यामुळे कांबरे,करंदी व नायगाव येथील शेती वाचेल असा प्रस्ताव मांडला. याला देखील सर्वांनी अनुमती दाखवली.
या प्रस्तावावर अधिक्षक अभियंता नागरगोजे यांनी बोलताना सांगितले कि, शेती वाचवून खर्चसुध्दा वाचत असेल, तर यावर निश्चित विचार केला जाईल. यासाठी राष्ट्रीय महामार्गाची परवानगी काढावी लागेल या नविन प्रस्तावातील रस्त्याबाबत कृती समिती सदस्य व अधिकारी एकत्र पाहणी करुन नकाशा तयार करुन रस्ते विकास महामंडळाचे मोपेलवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.