दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : सुरूर रस्त्यावरून वाईच्या एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण होऊन मोठमोठे फुट ते दिड फुटांचे खड्डे पडल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहन चालकांना वाहन चालवताना खड्डे चुकवत रस्ता शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
या रस्त्यावरून दररोज शेकडो अवजड वाहनांची ये जा होत असल्याने येथील रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे सध्या या रस्त्यावरून अपघातांची मालिका सुरु असल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची भावना आहे .
एमआयडीसीमधून मिळालेली माहिती अशी की, वाईच्या एमआयडीसीत शेकडो विविध
उद्योगपतींचे कारखाने आहेत. या कारखान्यांना मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या एमआयडीसीत वाई, खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर, कोरेगाव, मेढा या सहा तालुक्यातील गावामधील बहुतांशी तरूण वर्गासह महिला वर्ग हजारोंच्या संख्येने कामावर आहेत.
या ठिकाणी येण्याजाण्या साठी कामगारांना कुठलेही इतर वाहन नसल्याने बहुतेक कामगार दुचाकी वरुन आपल्या मुलांचे शिक्षण आणी प्रपंचाचा गाडा चालावा या भावनेपोटी येथे येऊन नोकरी करत असतात. कामगार ड्युटी संपल्यावर आपल्या दुचाकीवरुन घराकडे जाताना असणाऱ्या रस्त्यावर जवळपास पाच कि.मी. रस्त्यावर फुट ते दिड फुटांचे मोठ मोठाले खड्डे चुकवत जातात.
कामगारांना कामावर येताना आणी जाताना
फारच घाई असते. त्या मुळे वाहने सुसाट असतात. पण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्यात मुसळधार पावसाचे पाणी साचल्याने रस्ताच दिसत नसल्याने वाहने या खड्यात आदळून वाहनांचे टायर फुटून अपघात होतात.
अनेकांचे टायर फुटल्याने मोठमोठे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी होऊन अंथरुणावर पडून आहेत. हा रस्ता अनेक ठेकेदारांनी आजपर्यंत केला. पण पडलेल्या मुसळधार पावसाने त्या वरील खडी बाहेर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
येथील रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झाल्याने रस्त्याची चाळण झाली. एमआयडीसी कडे येणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसीच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने दयनीय अवस्था झाली आहे. पडलेल्या खड्ड्यांत तातडीने मुरुम भरुन तो वाहन चालकांना शाश्वत रस्ता द्यावा अशी मागणी हजारो वाहन चालक कामगारांनी केली आहे.
रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास रस्ता रोको सारखे आंदोलन करावे लागेल असा इशारा कामगार वाहन चालकांसह नागरिकांनी दिला आहे.