डॉ महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह
क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावरील सामना प्रत्येक देशासाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. याच मैदानावर काल भारताने इतिहास घडवत पहिल्या डावात पिछाडीवर असतानासुद्धा इंग्लंडवर रोमहर्षक विजय संपादित केला व कसोटीमध्ये आपणच दादा आहोत हे पुन्हा सिद्ध केले.
मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी दमदार फलंदाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्यामुळे भारताला इंग्लंडपुढे विजयासाठी २७२ धावांचे आव्हान ठेवता आले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा निम्मा संघ 67 धावांत तंबूत परतला होता. पण भारताच्या गोलंदाजांनी सातत्याने भेदक मारा करत इंग्लंडला १२० धावांमध्ये ऑलआऊट केले आणि १५२ धावांनी दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना अनिर्णीत राहिला होता.
कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारताची सुरुवात निराशाजनक झाली. भारताचा भरवश्याचा फलंदाज रिषभ पंत (२२) हा लवकर बाद झाला. त्यानंतर इशांत शर्माने (१६) काही काळ तग धरून राहण्याचा प्रयत्न केला.
इशांत शर्माला बाद केल्यावर जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांनी जिद्दीने फलंदाजी करत खेळपट्टीवर नांगर टाकला. शमीने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावत इंग्लंडला चोख उत्तर दिलं. शमी आणि बुमरा यांनी यावेळी नवव्या विकेटसाठी ८९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली.
शमीने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५६ धावांची खेळी साकारली. बुमरानेही यावेळी शमीला चांगली साथ दिली, बुमराने तीन चौकारांच्या जोरावर नाबाद ३६ धावा केल्या. लंचच्यावेळी भारताने यावेळी ८ बाद २९८ या धावसंख्येवर डाव घोषित केला आणि इंग्लंडला २७२ धावांचे आव्हान दिले.
इंग्लंड ही धावसंख्या लीलया पार करील असे सर्वांना वाटत होते. २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची २ बाद १ धाव अशी घसरगुंडी उडाली. त्यानंतर काही काळ इंग्लंडता कर्णधार ज्यो रुट हा खेळपट्टीवर ठाण मांडून होता, पण यावेळी बुमराने रुटला विराट कोहलीकरवी झेलबाद केले आणि भारताला मोठे यश मिळाले.
इंग्लंडची ५ बाद ६७ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मोहम्मद सिराजने आपल्या एकाच षटकात इंग्लंडच्या दोन फलंदाजांना बाद केले आणि सामना भारताच्या आवाक्यात आला. सलामीवीर राहुलला त्याने ठोकलेल्या घणाघाती शतकाबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.