दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
राजकीय दृष्ट्या जागृत आणी तालुक्याच्या राजकीय पटलावर निर्णायक भुमीका बजावणाऱ्या वाई तालुक्यातील ओझर्डे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहन ४ महिन्यांपूर्वी सिक्कीम मध्ये वीरमरण आलेले ओझर्डे गावचे सुपुत्र सोमनाथ अरविंद तांगडे यांच्या पत्नी श्रीमती रेश्मा सोमनाथ तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले.
गावचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण करण्यात आले . ओझर्डे ता.वाई येथील सामान्य कुटुंबातील असलेले सोमनाथ अरविंद तांगडे हे मनमिळाऊ, शांत स्वभावाचे आणि गणेश मंडळाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.
चार महिन्यांपूर्वी त्यांना सिक्कीममध्ये वीरमरण आले. त्यामुळे तांगडे कुटुंबावर फार मोठे संकट कोसळले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, सरपंच आनंदराव जाधव, उपसरपंच केशव पिसाळ यांच्यासह शासकीय अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या साक्षीने त्यांना अखेरचा निरोप दिला होता.
ओझर्डे ग्रामपंचायतीत सत्तेत असणारे आणि विरोधी खुर्चीत बसणारे या सर्वांनी एकत्रित येऊन व नुकतेच निवडुन येऊन नव्यानेच सरपंच पदावर विराजमान झालेले आनंदराव जाधव यांचा ध्वजारोहणाचा हक्क असताना देखील सर्वांच्या मतांचा आदर राखत वीरपत्नी रेश्मा तांगडे यांच्या हस्ते ध्वजारोहन करुन ओझर्डे ग्रामपंचायतीचा नवीन आदर्श घालून दिला.