राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंना बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना ‘पुण्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा मनसेने दिला आहे.
त्याला इतिहासाचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘पुण्याचे प्रवीण गायकवाड यांनाच पुण्यात फिरू देणार नाही, असे म्हणणेच हास्यास्पद आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, तालिबानी राज्य नाही, हे बहुतेक मनसे विसरलेली दिसतेय,’ असा टोला त्यांनी लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप केला होता. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरे यांच्या पायाशी आहेत; म्हणूनच त्यांची अधोगती झालेली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पलीकडे शिवाजी महाराजांचा इतिहास राज ठाकरेंना माहिती नाही.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाचं समर्थन राज ठाकरे यांनी करु नये, असा सल्लाही कोकाटे यांनी दिला आहे. पुरंदरे यांच्या पायाशी राज नसते, तर मसनेचे आमदार १३ वरुन ५० वर गेले असते, असेही कोकाटे या वेळी म्हणाले.
काय म्हणाले होते प्रवीण गायकवाड?
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये प्रविण गायकवाड म्हणाले होते, सन १८९९ चे वेदोक्त प्रकरण ते १९९९ ची राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना या दरम्यानचा काळ शंभर वर्षांचा आहे. या शंभर वर्षांच्या काळात झालेल्या मूळ सांस्कृतिक संघर्षाकडे दुर्लक्ष करुन राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर जातीचा मुद्दा मोठा झाला असे विधान करुन भलताच संघर्ष निर्माण करू पाहत आहेत.
खरेतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आडून शरद पवारांवर टीका करुन त्यांची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. राज ठाकरेंनी राजकीय स्वार्थासाठी पवारांवर टीका करुन दिशाभूल करण्याऐवजी महाराष्ट्राच्या राजकीय स्थित्यंतराचा थोडासा अभ्यास केला तर अनेक गोष्टींचा त्यांना उलगडा होईल.”
राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या अनेक वर्ष आधीच भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात जातीच्या मुद्द्याला जन्म घातला आहे. भाजपने माधवं या राजकीय सुत्राचा अवलंब करुन राज्यात विभागवार माळी, धनगर, वंजारी समाजातील नेतृत्व उभे केले आणि त्यांच्या आडून मराठा वगळून राजकारण हा डाव खेळला.
अर्थातच हा सगळा आरएसएस आणि पर्यायाने ब्राह्मणी मेंदूतून आलेला राजकीय विचार होता. राजकारणाच्या माध्यमातून जातीय संघर्षास खो घालणाऱ्या भाजपच्या त्या नीतीविषयी राज ठाकरे कधी बोललेले दिसून येत नाहीत.
१९८० नंतर महाराष्ट्रात मंडल कमिशनला विरोध करुन उभा केलेला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष, नामांतर प्रकरणात उभा केलेला मराठा विरुद्ध दलित संघर्ष, हे जरी राजकीय स्वरुपाचे असले तरी त्यात जातीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. राज ठाकरे या इतिहासाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, असा आरोपही गायकवाड यांनी ठाकरेंवर केला.
राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.
ठीक आहे, परंतु हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे, हे मात्र नक्की, असा दावाही त्यांनी केला.