नानाची टांग
प्रिय सासरेबुवा..
काल घरातील मुलांनी खुपच अर्जव करून माझ्याकडे आईला काहीतरी सांगा, म्हणून विनंती केली, म्हणून मी नाईलाजास्तव काल बायकोला चार शब्द जरा फारच कठोरपणे सुनावले आहेत.. म्हणजे आता मुलं बोललीच आहेत, तर मला बायकोला बोलणं भाग आहे..!
कारण जर मी आत्ता बायकोला बोललो नाही, तर तो पक्षपात ठरेल आणि माझ्या मुलांवर तो अन्याय देखील ठरेल..! सासरेबुवा माझी यात काही चूक झाली का? नव्हे, माझा त्याला नाईलाज आहे; कारण संपूर्ण समाज आणि परिसरातील सर्व कुटुंबे माझ्याकडे फारच आशेने पाहत होती की, मी मुलांनी माझ्याकडे केलेल्या तक्रारीची शहानिशा करावी आणि त्यासंदर्भात बायकोला दोन चार शब्द सुनावले पाहिजेत..!
त्यानुसार मी बायकोला फार म्हणजे फारच कठोर शब्द सुनावले आहेत की, तिने फार उशिरा म्हणजे सकाळचा स्वयंपाक अगदी संध्याकाळी करणे योग्य नाही. फार फार तर तो दुपारी दोन किंवा तीनच्या दरम्यान करावा आणि अर्थात तो निर्णय देखील तिने स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीने निर्णय घ्यावा. मी त्यामध्ये दखल घेऊ शकत नाही. कारण अर्थातच मी काय बायकोला आदेश देऊ शकत नाही..!
लोकांना वाटत असेल की, मी नवरा आहे म्हटल्यावर बायकोला सांगितलेच पाहिजे, परंतु लग्न होताना सासरेबुवा तुम्ही सांगितले होते की, नवरा आणि बायको रथाची दोन चाके आहेत.. जसे की एखाद्या कंपनीतील व्यवस्थापन आणि व्यवस्थापकीय संचालकांचं नातं असतं..! किंवा एखाद्या शेतातील शेतकरी आणि मुकदमाचं असतं! किंवा एखाद्या शाळेतील प्राचार्य आणि जास्त काळ काम केलेल्या प्राध्यापक; किंवा फार तर एखाद्या राज्याचा न्यायाधीश किंवा कायद्यावर राजपत्र काढणाऱ्या राज्यपालाचं असतं..! यामध्ये एकमेकांना आदेश देण्याचा भाग येतो कुठे?
अगदी तस्संच..आवडो अथवा न आवडो, बायको मला समसमान आहे.. त्यामुळे मी बायकोला आदेश देऊ शकत नाही.. अर्थात बायकोनं उशिरा स्वयंपाक करणं सध्या तरी माझ्या तत्वात काही बसत नाही..! पण म्हणून बायकोने लगेचच स्वयंपाक करावा असंही काही नाही आणि बायकोने माझं ऐकावं, असं तर मुळीच काही नाही..! कारण अर्थातच नवरा आणि बायको एका रथाची दोन चाके आहेत..!
मुलांना स्वयंपाक लवकर व्हावा असे वाटते.. बायकोला मुलांची जिरवावी अशी वाटते.. मला तर यात कोणाच्याच अध्यात ना मध्यात पडावे असे वाटते..! मंग सासरेबुवा यात काय करावे असे तुम्हाला वाटते? हे बघा, आता या घटनेला आठ महिने होत आलेत.. खरं तर स्वयंपाक उशिरा होणं.. तो अगदी आठ महिन्यापर्यंत उशिरा होणं.. हे चांगल्या घराच्या दृष्टीने चांगली बाब नाही.. पण म्हणून मी काय बायकोला आदेश देणार नाही… कारण नव्याचे नऊ दिवस सरले, म्हणजे नऊ महिने झाले की काहीतरी चांगले प्रसृत होईल असं मलादेखील वाटते.. यात काहीच शंका नाही; म्हणूनच मी काय बायकोला आदेश देऊच शकत नाही..!