इंदापूर : महान्यूज लाईव्ह
विविध मागण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माऊली चवरे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर-बारामती रस्त्यावर शेळगाव फाटा येथे सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेळगाव ते निमगाव रस्त्यावरील पूल दुरुस्त करावा व पर्यायी रस्ता द्यावा, कडबनवाडी – शेळगाव – रुई रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 4 कोटीचा निधी दिलेल्या रस्त्याचे संपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, कडबनवाडी येथील चिंकार अभय वन हे शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द करण्यात यावे तसेच शेळगाव येथील संत मुक्ताबाई मंदिरासमोर 100 वर्षांपूर्वीची धोकादायक इमारत आहे, ग्रामस्थांनी ठराव करून देखील इमारत न पाडणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी आदी मागण्या या रास्ता रोको आंदोलनप्रसंगी करण्यात आल्या.
निमगाव केतकीचे मंडल अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले. शासनाने वरील मागण्यांची तातडीने दखल घेऊन पूर्तता करावी अन्यथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी बोलताना माऊली चवरे व इतर भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला.
या रस्ता रोको आंदोलनामध्ये विठ्ठल जाधव, मोहनराव दुधाळ, भागवत भुजबळ, धनाजी ननवरे, आकाश कांबळे, पांडुरंग शिंदे, राजकुमार जठार, आबासाहेब थोरात, ललित होले, शिवाजी शिंगाडे, राहुल जाधव व भाजपचे कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते.











