डॉ महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह
सांगली कोल्हापूर आणि कोकण विभागात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीमुळे तेथील लोकांवर गंभीर संकट ओढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील निमा डॉक्टर संघटनेने मदतीसाठी डॉक्टरांना आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद भेटत डॉक्टरांनी व नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणावर दैनंदिन आवश्यक वस्तू व आर्थिक निधी गोळा केला.
चिपळूण नजीक खेर्डी व शंकरवाडी या गावांमध्ये एकत्र झालेली मदत पोचवण्यात आली. त्यामध्ये 130 कुटुंबांना किमान दहा दिवस पुरेल एवढा अन्नसाठा तसेच दैनंदिन वापरात येणाऱ्या वस्तू, दूध, पाणी बॉटल, कपडे, भांडी असे साहित्य वितरित केले गेले.
पूर्व भागातील परिस्थिती अत्यंत भयानक असून आपल्याला शक्य तेवढी मदत त्यांना पोहोचणे आवश्यक आहे, पूरग्रस्तांना आर्थिक मदती बरोबरच भावनिक आधार देणे खूप महत्त्वाचं आहे, असं ‘महान्यूज’शी बोलताना टीम निमाच्या डॉक्टरांनी सांगितलं. तसेच पुरामुळे येत्या काही दिवसात रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यासाठी डॉक्टरांची टीम सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.











