शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या इब्राहिम गणी शेख या पोलिस कर्मचाऱ्यावर अवैध धंद्याविरुद्ध कारवाई न करता, उलट पैशांची वसुली केल्याबद्दल, तसेच इतरही अवैध कृती केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेवेतून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी नुकतेच आदेश काढला आहे.
याबाबत आलेल्या आदेशानुसार, इब्राहिम गणी शेख याची शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणूक असून तो शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत कर्तव्यावर असताना हद्दीतील वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक मालकांकडून पैशाची वसुली करून अवैध धंद्यांस प्रोत्साहन देत होता.
त्याचबरोबर अवैध धंद्यांबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संशयित अज्ञात व्यक्तींच्या मोबाईलवरून पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे करणाऱ्या मालकांशी परस्पर संपर्क साधत होता. तपासणीत हे निष्पन्न झाल्याचे आदेशात म्हटले असून शासकीय कर्मचाऱ्यास अशोभनीय वर्तन करून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्या मधील नियमाचे उल्लंघन केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
यामुळे शिस्तभंगविषयक कार्यवाहीच्या अधीन राहून तात्काळ पोलिस सेवेतून निलंबित करण्याचा आदेश पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी काढला आहे. शिरूर पोलिस स्टेशन येथे नेमणुकीस असलेल्या इब्राहिम शेख याच्यावर निलंबनाची कारवाई थेट पोलिस अधीक्षकांनी काढल्याने शिरूर शहरात व पुणे जिल्ह्यातील पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे.











