बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती हे राज्यस्तरावर व देशाच्या स्तरावर राजकीय केंद्र म्हणून ओळखले जात असले तरी विकासाच्या पाऊलखुणा जसजशा गडद होत आहेत, तसतसे बारामतीचे महत्व वेगवेगळ्या प्रकारे वाढू लागले आहे. आता बारामती हे चित्रपट, मालिकांसाठीही डेस्टीनेशन हब बनू लागले आहे. मागील दोन वर्षांपासून येथे चित्रपट, मालिकांचे शुटींग होत असून काही महिन्यांपूर्वीच येथे एक वेब सिरीज चित्रीत झाली. त्यावेळी बारामती व तालुक्यातील व्यावसायिकांना १ कोटीपर्यंतचा मेहनताना मिळाला होता. आता एका मराठी चित्रपटाने व्यावसायिक व जुनिअर कलाकारांना मालामाल केले.
बारामतीत नुकतेच टकाटक -२ या चित्रपटाचे शुटींग वेगवेगळ्या ठिकाणी झाले. काही शुटींग भोर तालुक्यात झाले. बारामतीत अभिनेते राहूल जगताप ढाकाळकर यांच्या पुढाकारातून हे शुटींग झाले. हे शुटींग नुकतेच पूर्ण झाले असून या शुटींगच्या निमित्ताने कोरोनाच्या काळात टंचाईचा सामना करणाऱ्या व्यावसायिकांना चांगलाच दिलासा मिळाला. या चित्रपटाच्या शुटींगसाठी लागणाऱ्या साहित्यापासून कलाकारापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यावसायिकांना २० ते २५ लाखापर्यंतची रक्कम मिळाली.
हा चित्रपट कधीही प्रदर्शित होऊ दे, मात्र बारामतीतील व्यावसायिकांना अगदी ऐन वेळी या चित्रपटाने देखील हात दिला होता हे येथील व्यावसायिकही विसरणार नाहीत. यासंदर्भात राहूल जगताप यांनी सांगितले की, बारामतीत आतापर्यंत तीन वेळा चित्रीकरण झाले. यातून स्थानिक व्यवसायिकांना चांगला मेहनताना मिळाला.











