सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर पंचायत समितीस आय.एस.ओ. ने प्रमाणित केले असून आय.एस.ओ दर्जा प्राप्त करणाऱ्या इंदापूर पंचायत समितीमुळे इंदापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याची एक प्रकारे पावती मिळाली असून खासदार सुप्रिया सुळे यांनी आय एस ओ 9001- 2015 मानांकन मिळाल्याबद्दल करत इंदापूर पंचायत समितीचे अभिनंदन केले आहे.
इंदापूर पंचायत समितीने शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देऊन जिल्ह्यांमध्ये आदर्श निर्माण केला आहे.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये पायाभूत सुविधा, विविध विकास कामे व कार्यालयातील सेवा सक्षमपणे राबवण्यात आलेली आहे.
कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तसेच कार्यालयांमध्ये अभिलेख वर्गीकरण, लिस्ट ऑफ फाईल, रजिस्टर्स तयार करण्यात आलेले आहेत. कार्यालयामध्ये अग्निशामक यंत्रणा, रेन हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा, सूचना पेटी, नोटीस बोर्ड परिसर सुशोभीकरण, प्राथमिक शाळेतील मुलांना ऑनलाइन शिक्षण इत्यादी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे व सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त करता आले अशी प्रतिक्रिया गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्राने सी एस आर निधीतून अग्निशामक यंत्रणा, सूचना पेटी, नोटीस बोर्ड, कर्मचारी नंबर प्लेट इत्यादी साहित्य देऊन मोलाचे योगदान दिले.











