शीतल थोरात : महान्यूज लाईव्ह
मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा त्याच्या चित्रपट व वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. हिंदी चित्रपटांबरोबरच तो मराठी चित्रपटात देखील दमदार भूमिका बजावतो. मराठी चित्रपटसृष्टीतील लयभारी आणि माऊली या चित्रपटानंतर तो आता पुन्हा मराठी चित्रपटाकडे वळला आहे.
रितेश देशमुख आता ‘अदृश्य’ या थ्रिलरपटात दिसणार आहे. बॉलिवूडमधले प्रख्यात छायांकनकार कबीर लाल या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.
कबीर आणि रितेश तब्बल २० वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या रितेशच्या पहिल्या चित्रपटाचे छायांकनकार कबीर होते.
या संदर्भात रितेश देशमुख म्हणाला, “मी आता चित्रपटांत काम करत असल्याचं कारण कबीर लाल आहेत. सुभाष घई दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाच्या सेटवर मी शूटिंग बघायला गेलो होतो. त्यावेळी माझी आणि कबीर यांची भेट झाली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटासाठी त्यांनी माझं नाव सुचवलं आणि त्याच चित्रपटानं माझ्या करिअरची सुरुवात झाली. तब्बल २० वर्षांनंतर त्यांच्याबरोबर काम करताना खूप छान वाटत आहे. असे त्याने सांगितले आहे.
दरम्यान, ‘टोटल धमाल’ या चित्रपटानंतर रितेश देशमुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. तो या चित्रपटाच्या पुढच्या भागात दिसणार आहे, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात ते शक्य झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांची रितेश निर्मिती करत आहे. त्याचं दिग्दर्शन नागराज मंजुळे करणार आहे.











