दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : गेली काही दिवस महाबळेश्वर शहर व परिसरात कोसळणाऱ्या पावसाने मंगळवार अखेर (२२९४ मिमी) ९० इंच पावसाची नोंद झाली होती. बुधवारी दिवसभरात सात ते आठ इंच पावसाची नोंद झाल्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसाने महाबळेश्वर, पाचगणीच्या मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती.
महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ‘ओव्हरफ्लो’ होतो. मात्र २०१५ नंतर यंदा पहिल्यांदाच जून महिन्यातच वेण्णालेक तलाव तुडुंब भरून वाहू लागला.
जून महिन्याच्या अखेरीस व जुलै महिन्याच्या प्रारंभी पावसाने दडी मारली. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु झालेल्या पावसाची धुवांधार सुरूच असून जोरदार वाऱ्यासोबत मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
या संततधार पावसाने महाबळेश्वर, पाचगणी मुख्य रस्ता हा वेण्णालेक नजीक सुमनराज परिसरात मंगळवारी सायंकाळी पाण्याखाली गेला होता. बुधवारी सकाळी व सायंकाळी देखील धुवाधार पावसामुळे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.
संततधार पावसाने महाबळेश्वरचे निसर्गवैभव खुलले असून पावसाळी हंगामास बहर आला आहे. येथे पर्यटनास आलेले पर्यटक या पावसात मनमुराद भिजण्याचा आनंद लुटत आहेत.











