दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथील खंडणीखोर आणि तोतया सामाजिक कार्यकर्ता म्हणून वावरणारा राजेश पांडुरंग लाड याच्यावर दौंड पोलीस स्टेशनला एका डंपर व्यवसायिकाला खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. असे असतानाच आता या खंडणीखोर राजेश लाड चे एक से बढकर एक कारनामे समोर येऊ लागले आहेत.
आज बुधवारी (दि.21) लाड च्या विरोधात दौंड पंचायत समितीच्या बांधकाम शाखा अभियत्यास दहा लाखाची खंडणी मागितली, तर पाटस येथील एका ट्रॅक्टर व्यवसायिकास वीस हजार रुपये खंडणी स्वरुपात जीवे मारण्याची धमकी देत घेतल्याप्रकरणी पाटस पोलीस चौकीत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही माहिती यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस येथील राजेश पांडुरंग लाड हा सामाजिक कार्यकर्ता असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी देत खंडणी स्वरूपात पैशाची मागणी करीत असल्याची तक्रारी आल्या आहेत.
दौंड पंचायत समितीचे बांधकाम शाखा अभियंता जितेंद्र बलभीम शिंदे (रा. गोपाळवाडी ता.दौंड जि.पुणे ) यांनी पाटस पोलीस चौकीत तक्रार दिली आहे. शाखा अभियंता जितेंद्र शिंदे यांच्या देखरेखीखाली दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील एकुण ३० गावांमधील रस्ते व पूल व इतर शासकीय बांधकामे चालू आहेत. मागील दोन वर्षापासून राजेश पांडुरंग लाड हा चालू असलेल्या रस्त्याची, पुलाची व सरकारी बांधकामे ही कामे निकृष्ट दर्जाची आहेत. अशा प्रकारचे माहितीच्या अधिकारात तक्रार अर्ज करीत होता. या तक्रार अर्जाची चौकशीकरता त्यास बोलावले असता तो अर्ज निकाली काढण्याकरीता पैशाची मागणी करीत असे.
गेल्या दोन वर्षापासून म्हणजेच सन 2019 पासून वेळोवेळी त्याने माझ्या विरुद्ध शासकीय कामांचे संदर्भाने माहितीच्या अधिकारात तक्रार अर्ज करून पैशाची मागणी करून पैसे दिले नाही, तर तुझ्याकडे बघून घेतो, तुझे हात पाय मोडून ठेवतो अशी धमकी देऊन आता पर्यंत चार वेळा पंचवीस हजार आणि दोन वेळा पाच हजार असे एकूण एक लाख दहा हजार रुपये खंडणी स्वरूपात घेतले आहेत अशी तक्रार शिंदे यांनी केली.
मागील पंधरा दिवसापूर्वी लाड याने पाटस जिल्हा परिषद गटातील शासकीय निधीतून चालू असणारी व पुर्ण झालेल्या रस्त्याची, पुलाची बांधकामे या कामांची माहितीच्या अधिकारात माहिती मिळावी अशी मागणी केली आहे. सदर कामे निकृष्ट दर्जाची झालेले आहेत त्या कामाची चौकशी व्हावी. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे अर्ज केला.
लाड याने सोमवारी ( दि. 12 ) दौंड पंचायत समिती मधील बांधकाम विभागाच्या कार्यालयात मी तुमच्या विरोधात माहितीच्या अधिकारात पुणे जिल्हा परिषद अर्ज केला आहे. तुम्ही मला एक लाख रुपये दिले, तर मी माहिती अधिकारात माहितीचा पाठपुरावा करणार नाही हा अर्ज मागे घेतो असे सांगितले. मंगळवारी ( दि. 20 ) शिंदे हे शासकीय कामानिमित्त पाटस ग्रामपंचायत येथे आले असता, लाड याने शिंदे यांना पाटस टोल नाक्याजवळील अंबिका हॉटेल मध्ये बोलवून तुमची जिल्हा परिषद येथे माहिती अधिकारात माहिती मागवली आहे. अर्ज माघारी घेयची असेल
तर आता माझी भूक वाढलेली आहे, आता तुम्ही मला पाच ते दहा लाख रुपये द्या मी अर्ज मागे घेतो, 2 आगस्टच्या आत पैसे नाही दिले तर मी माझ्या मार्गाने तुमच्यावर कारवाई करील अशी धमकी दिली.
यासंदर्भातील संभाषण मोबाईलवर शिंदे यांनी रेकॉर्डिंग केले आहे. शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लाड याच्या विरोधात धमकी देवून पाच ते दहा लाख रुपये खंडणीस्वरूपात मागणी केल्याची फिर्याद दिल्याने राजेश लाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.
पाटस येथील टॅक्टर व्यावसायिक राजेंद्र रामदास घाडगे यांचा अष्टविनायक रोडचे कामावर टॅक्टरने रोटी येथील हद्दीतून दौंड तहसीलदार यांनी रितसर परवानगी दिल्याने मुरूम वाहतुक आणि मुरूम काढून सपाटीकरण करण्याचे काम करीत आहेत. यावेळी राजेश लाड याने मोबाईल मध्ये फोटो काढून तुम्ही अवैध मुरूम उपसा वाहतुक करीत आहे. याबाबत तहसीलदार आणि प्रांतसाहेब यांच्याकडे तक्रार करणार आहे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मला वीस हजार रुपये दे, नाही तर तुला जीवे मारून मातीत गाडून टाकीन अशी धमकी दिली. या भितीपोटी घाडगे यांनी वीस हजार रूपये खंडणी स्वरूपात दिले. याबाबत राजेंद्र घाडगे यांनी पाटस पोलीस चौकीत फिर्याद दिल्याने राजेश पांडुरंग लाड यांच्यावर जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी स्वरूपात पैसे घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारची धमकी देवून खंडणी स्वरूपात कोण मागणी करीत असेल तर अशा खंडणीखोर व्यक्तींच्या विरोधात न घाबरता तक्रार देण्यास पुढे यावे , अशा स्वयंघोषीत सामाजिक कार्यकर्तै आणि खंडणीखोरांच्या विरोधात कठोर अशी कायदेशीर कारवाई केली जाईल. असे आश्वासन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिले आहे.











