राज्याला मिळालेल्या निधीपासून रुग्णांच्या स्थितीपर्यंत शिवसेनेकडून मिळणार उत्तर
मुंबई : महान्यूज लाईव्ह
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन घेतलेल्या पत्रकार परीषदेत राज्याला केंद्राने २८ हजार कोटी दिल्याचा व रस्त्यावर कोरोना रुग्ण मरत असल्याचा गंभीर आरोप केला होता, हा आरोप महाविकासआघाडीच्या जिव्हारी लागला असून महाविकासआघाडीच्या वतीने शिवसेना त्या आरोपांची पोलखोल करणार आहे.
शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राला मुळात किती निधी मिळाला याची अत्यंत सोप्या शब्दांत आकडेवारीसह स्पष्टता दिली जाईल. देवेंद्र फडणवीस यांनी २८ हजार कोटींचा आकडा सांगतानाही एकमेकांत सरमिसळ केली. पण शिवसेना या आकडेवारीची पोलखोल करेल. एवढेच नाही, तर रेल्वे कशा पाठवल्या, त्यांची किती रक्कम सरकारने भरली व रुग्णांलयांमधील स्थिती कशी आहे याचीही बित्तंबातमी पुराव्यासह स्पष्ट केली जाईल.
माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पत्रकार परीषद घेऊन सरकारवरती घणाघाती टिका केली होती. मात्र त्यामध्ये शिवसेनेची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता शिवसेनाच त्यास उत्तर देणार असल्याने भाजपने केलेली मल्लीनाथी शिवसेनेपुढे टिकणार नाही असेच दिसते. त्यातच काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सरकारला अस्थिर करण्यासाठी खुद्द राज्यपाल देखील भाजपच्या बरोबरीने सक्रीय आहेत असा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर अपक्ष मंत्री बच्चू कडू यांनी हे पाप कुठे फेडाल अशा शब्दांत भाजपवर टिका केली होती. संकटाच्या काळात एकमेकांच्या हातात हात घालण्याऐवजी वार करण्याची प्रथा महाराष्ट्रात केव्हा पाडली असा सवाल त्यांनी केला होता. या साऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना काय उत्तर देते याची उत्सुकता आहे.










