संदीप मापारी पाटील, बुलढाणा
कवी म्हणतो, अंधारून आले भोवताली जरी, जगण्याचा खेळ चाले.. उन सावलींचा! बंद पापणीच्या मागे स्वप्न पाहण्याचा! नव्या किरणांच्या सरी.. तुझ्या सोबतीला.. या कवितेच्या ओळी काल आठवल्या.. जेव्हा एक जन्मदाता बाप आपल्या आय़ुष्यातील सर्व कार्यपूर्तीनंतरही मुलीच्या वाट्याला असा आला की, त्यातून मुलीचे आयुष्य वाढले.. होय, ! गंगाधर शिंदे यांनी मुलीला किडनी दान केली..ही ती आठवण येण्यासाठीची घटना होती.. या किडनीचं प्रत्यारोपण नुकतेच यशस्वी झाले..!
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील गंगाधर शिंदे यांनी आपल्या मुलीला किडनी देऊन एक वेगळाच आदर्श निर्माण केला. यामुळे मुलाबरोबरच जीवापाड मुलीवरही प्रेम करणारा बाप असतोच, याची खूणगाठ आणखीच पक्की झाली.
गंगाधर शिंदे यांना दोन मुले, दोन मुली असा परिवार. ते औंढानागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे राहतात. त्यांच्या दोन्ही मुली लग्न करुन हया बुलढाणा जिल्ह्यात मापारी परिवारामध्ये दिलेल्या आहेत, परंतु मोठी मुलगी व जावई हे प्राचार्य व मुलगी शिक्षक असल्याने नोकरीनिमित्ताने जवळा बाजार येथे राहतात.
संगीता सतीश मापारी असे त्यांचे संपूर्ण नाव आहे. संगीता यांना मध्यंतरी अचानक त्रास सुरू झाला. त्यांच्या किडन्यांना विकार असल्याचे डॉक्टरांनी निदान केले आणि मापारी कुटुंबाला धक्का बसला. मुंबई, पुणे, हैदराबाद, औरंगाबाद, नगर व महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तपासणी केल्यानंतरही हेच निदान कायम झाल्यानंतर काय करायचे हा प्रश्न पुढे उभा राहीला.
मात्र वडील गंगाधर यांनी मुलगी संगीता यांना धीर दिला व प्रसंगी माझी किडनी दान करतो, मात्र मुलीला काही होऊ देणार नाही असा निश्चयही केला. त्यानुसार सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांची किडनी मुलीला योग्य ठरू शकते असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
मग सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून नांदेड येथील ग्लोबल या दवाखान्यात डॉक्टर राजीव राठोड, विजय मैदपवाड या डॉक्टरांच्या पथकाने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. दवाखान्यातून डिस्चार्ज मिळताना या कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही.











