दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील सरकारी १२ आणि खाजगी ३२ अशा पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संपास सुरवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील ११७ गावातील हजारो जनावरांच्या आरोग्याचा ऐन पावसाळ्यात गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
या संपासंदर्भात वाई तालुक्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. बिपीन खरात यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांना निवेदन दिले आहे. या डॉक्टरांचा संप लवकर संपावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
सरकारच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत वाई तालुक्यातील ओझर्डे, शिरगाव, किकली, पाचवड, ऊडतेरे, बावधन, ऊळुंब, रेणावळे, वेलंग, बोपर्डी, मांढरदेव, केंजळ, सुरुर, कवठे या गावांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचार होतात. तर याखेरीज खासगी पशुवैद्यकीय तज्ज्ञही अगदी गोठ्यांवर जाऊन उपचार करतात.
त्यांची गरज इतर ऋतुंपेक्षा पावसाळ्यात अधिक असते. पावसाळ्यात लाळ्या खुरकूत, आंत्रविकार या आजारांची प्रामुख्याने मोठी लागण होण्याचा धोका असतो. त्यातही जिथे जास्त पाऊस पडतो, त्या भागात तर त्याचा धोका असतोच, त्यामुळेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील या भागात ऐन अडचणीच्या काळात डॉक्टर संपावर गेले असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.











