राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : तालुक्यातील पुर्व भागातील मलठण, वाटलुज आणि नायगाव येथील भीमा नदीच्या पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू उपसावर आज दौंड महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल 60 लाखांचा मुद्देमाल जागीच नष्ट करुन मोठी कारवाई केली.
ही माहिती तहसीलदार संजय पाटील आणि निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी दिली. मलठण, वाटलुज, नायगाव, राजेगाव या भागात स्थानिक वाळू माफियांनी यांत्रिक बोटी नदी पात्रात उतरुन चोरट्या पद्धतीने बेकायदा वाळू उपसा सुरू केला होता. ही माहिती मिळताच तहसीलदार संजय पाटील यांनी तातडीने पथक कारवाई साठी तैनात केले.
तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सचिन आखाड़े यांच्या पथकाने मलठण, वाटलुज, नायगाव या भागातील भीमा नदीपात्रातील 3 सेक्शन बोटी व 3 फाइबर बोटी, एकूण 6 बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या बोटी असा एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करुन कारवाई केली.
महसूल विभागातील अव्वल कारकून विजय खारतोडे, मंडलाधिकारी मंगेश नेवसे, दादा लोणकर, तलाठी दुष्यंत पाटील, शशिकांत सोनवणे, दिपक पांढरपट्टे, दिपक अजबे, आनंद ढगे, जयंत भोसले आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, दौंड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी या भागातील बेकायदा वाळू उपसावर कारवाई केली होती, मात्र महसूल विभागाने ही स्थानिक वाळूमाफियांनी भीमा नदीच्या पात्रात बेकायदा वाळू उपसा करण्यासाठी यांत्रिक बोटी नदी पात्रात उतरुन महसूल विभागाला आव्हान दिले होते.
तहसीलदार संजय पाटील यांच्या पथकाने मलठण वाटलुज नायगाव राजेगाव या भागातील बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू बोटी उध्वस्त करून वाळू माफियांना मोठा दणका दिला आहे. चोरुन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही अशीच कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.











