पुण्याच्या वेशीवर बिबट्याची धडक
अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
वानवडी : आज पुण्यात एका मोठ्या योगायोगाची चर्चा अगदी योगायोगाने झाली. वानवडी येथे वन विभागाचे वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले आणि योगायोगाने पहिलाच बिबट्या हडपसर जवळ मांजरी या परिसरात दिसून आला.
हडपसर जवळ मांजरीमध्ये बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने खळबळ उडाली असून शेतकरी आणि नागरिक यामुळे भयभीत झाले आहेत. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन आमदार चेतन तुपे आणि वनाधिकारी यांनी केले.
साडेसतरा नळी येथील शेतकरी दत्तात्रेय तुपे आणि अमर तुपे यांच्या शेतात तीन चार दिवसापासून बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. तर आज संध्याकाळी एका व्यक्तीने बिबट्या पाहिल्याचे सांगितले. सदर घटनेबद्दल आमदार चेतन तुपे यांनी वनाधिकाऱ्यांना कळवले वन अधिकारी यांनी पाहणी केली असता ते ठसे बिबट्याचे असल्याचे सांगितले.
ही बातमी सोशल मीडिया वरून परिसरात पसरल्याने सर्व ग्रामस्थ सतर्क झाले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी . रात्री-अपरात्री फिरू नये. उद्या रेस्क्यू टीम जागेवर जावून पाहणी करणार आहे असे वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी सांगितले











