By Team Mahanews Live
सहदेव सहारण यांच्या कुटुंबात सध्या ऐन पावसाळ्यात दिवाळीचे वातावरण आहे. सहदेव यांच्या पाचही मुली चक्क प्रशासकीय सेवेत काम करणार आहेत. दहा वर्षांपासूनचा हा कुटुंबातील सिलसिला आता एकाच वेळी तीन मुलींनी राजस्थान सरकारची स्पर्धा परीक्षेला गवसणी घातल्याने एकदम कळशाध्यायावर पोचला आहे.
सहदेव यांच्या दोन मुली रोमा आणि मंजू राजस्थान सरकारच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आधीच साहेब झाल्या आहेत. यामध्ये रोमा हिने सन २०११ मध्येच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन गटविकास अधिकारी बनली. त्यानंतर मंजू ही सन २०१२ च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाली व ती आता सहकार खात्यात सहायक निबंधक पदावर पोचली आहे. या दोघींचा आदर्श समोर ठेवून सहदेव यांच्या तीन मुली देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होत्या. five sisters of a family from Rajasthan
दरम्यान आता नुकतीच आय़ोगाच्या स्पर्धा परीक्षेतील निकालाची आकडेवारी आली असून या निकालात चक्क तीनही मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. अंशू, ऋत्विका व सुमन या तीन मुली आता उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये अंशू हिने ३१ वा क्रमांक, ऋत्विका हिने ९६ वा तर सुमन हिने ९८ वा क्रमांक मिळवला. अर्थात एकाच कुटुंबातील तीन मुली उत्तीर्ण होण्याची ही राजस्थानातील पहिलीच वेळ असून त्यातही एकाच कुटुंबातील पाच मुली चक्क प्रशासकीय सेवेत पोचल्याने ही देशातील पहिलीच घटना आहे.
राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील भेरुसरी या गावात सहदेव सहारण राहतात. ते शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या घरातून प्रशासकीय सेवेत, तेही एकाच कुटुंबातील पाच मुलींनी थेट सरकारी सेवेत पदाला गवसणी घालण्याचा हा दुर्मिळ प्रकार असला तरी देशभऱातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आदर्श व प्रेरणादायी असाच ठरणार आहे.











