बारामती : महान्यूज लाईव्ह
भोपाळ येथील दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या पंजाब नॅशनल बॅंकेचे १८.५० कोटींचे धनादेश क्लोनिंग करून आयडीबीआय बॅंकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडिसा येथील एका व्यक्तीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. या प्रकरणात बॅंकेचा मॅनेजर अगोदरच पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र काटेवाडी येथील योगेश अजित काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती) हा फरार होता. त्याला बारामती पोलिसांनी पकडून भोपाळच्या टास्क फोर्सच्या ताब्यात दिले.
बारामती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी हा गुन्हा भोपाळ मध्ये घडला होता. त्याचा तपास स्पेशल टास्क फोर्स भोपाळ यांच्याकडे असून या प्रकरणात आयडीबीआय बॅंकेचा मॅनेजर सरोज महापात्रा याला पूर्वीच अटक केली आहे.
या गुन्ह्यातील दुसरा आरोपी योगेश यास भोपाळ पोलिस शोधत होते. भोपाळच्या स्पेशल टास्क फोर्सने यासंदर्भात पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांची मदत मागितली, त्यावरून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या सूचनांवरून ढवाण यांनी स्वतःसह सहायक निरीक्षक श्री. प्रमोद पोरे, पोलिस शिपाई कांबळे, सपकळ, महिला पोलिस अंमलदार काळे यांचे पथक तयार करून योगेश याचा ठावठिकाणा शोधण्याची सूचना केली. त्यानुसार तांत्रिक माहितीच्या आधारे योगेश यास मोरगाव येथून ताब्यात घेतले व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले











