विवाहितेच्या छळाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी झाली आहे अटक
पुणे : भारतात राजकीय नेत्यांचे, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सल्लागार किंवा गुरू बनले की सामान्यांचा ओघ आपोआप वाढतो आणि हजारो, लाखो रुपये पायाशी सहजरीत्या पडतात.. मात्र असे भामटे गुरु प्रत्यक्षात अक्कलशून्य असतात, हे आजवर अनेकदा अनेकांच्या बाबतीत कळून आले आहे. मग स्वतःवर गोळी मारून घेणारा अध्यात्मिक गुरू भैय्या असो किंवा चंद्रासारखा दिसणारा स्वामी असो; पण एक दुर्दैव असे की, रूढी आणि रीतीरीवाजाच्या जोखडात अडकलेला भारतीय समाज मात्र यातून बोध घ्यायला तयार होत नाही. पुण्यातील येमूल महाराज हा त्यापैकीच एक!
अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आध्यामिक गुरू असलेले रघुनाथ येमूल याला साऊथ मधील गायकवाड कुटुंबाचे प्रकरण चांगलेच भोवले आहे. त्याला या प्रकरणी अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आता येमुल गुरुजीला न ओळखणारे हा गुरुजी कोण? असा प्रश्न विचारू शकतात. मात्र हा गुरुजी म्हणजे पुण्यातला प्रख्यात ज्योतिषाचार्य स्वतःला ‘ध्यानगुरु रघुश्री’ म्हणून घेणारा भामट्या असल्याचे आता सिद्ध झाले आहे. दुसऱ्याच्या लेकीबाळींचा तळतळाट घेणार ‘गुरु’ कसा असू शकतो? हा प्रश्न आपोआप पडल्याशिवाय राहत नाही.
या येमुल गुरुजीने देशभरातील इतर भामट्या धर्मगुरू सारखाच स्वतःचीच स्वयंघोषित हिंदू संस्कृती तयार करण्याची पद्धत चालवली आणि स्वतःचा एक ‘नीती’ संप्रदाय सुद्धा चालू केला आहे. या गुरुजीच्या दरबारात अनेत जण नित्यनेमाने हजेरी लावत होते.
या रघु येमूल ने सिद्धी कर्मयोगी फाउंडेशनची स्थापना केली असून, तो स्वत:ला ज्योतिषाचार्य देखील समजतो. एवढेच नाही तर सोशल मीडियावर दररोजचे दिनविशेष आणि भविष्य सांगतो. शिवाय आपला हात दाखवून भविष्य जाणून घेणाऱ्यांना अपॉइंटमेंट घ्यावी लागते.. त्यासाठी हजारो रुपये मोजले जातात. 48 वर्षीय रघुनाथ येमुल हा पुण्यातील बाणेरमध्ये आयव्हरी इस्टेट भागात राहतो. राजकीय क्षेत्रापासून प्रशासनापर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येंमुलचे निकटचे संबंध आहेत.
अशा स्वयंघोषित धर्मगुरूला तशाच स्वरूपाचे पालथ्या पायाचे भक्त भेटले नसतील तरच नवल! सहाजिकच औंध भागातील गायकवाड कुटुंबातील गणेश याला तुझी पत्नी पांढऱ्या पायाची आहे तिची जन्मवेळ चुकीची आहे तुझी बायको म्हणून ते राहिली तर तो आमदार किंवा खासदार किंवा कोणीही होऊ शकणार नाही त्यामुळे तिला सोडचिट्टी देईल मी देतो ते लिंबू तिच्यावरून टाक असे सांगितले अमोल गुरुजी च्या या सांगण्यावर विश्वास ठेवून गायकवाड कुटुंबाने विवाहितेचा छळ केला. या विवाहितेच्या छळाप्रकरणी रघुनाथ येमूल याला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक झाल्याचे समजल्यावर त्याच्या भक्तांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. त्याला ज्या पोलीस कोठडीत ठेवले होते, तेथे येरझार्या घालण्यास सुरुवात केली.
येमूल गुरुजीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून गायकवाड कुटुंबाने सुनेचा छळ केला. शारीरिक व मानसिक अत्याचार करण्याबरोबरच अमानुष मारहाण केल्याप्रकरणी गायकवाड कुटुंबातील ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपी केदार गायकवाड आणि राजू अंकुश हे दोघे फरारी आहेत. इतरांना अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. आता येमुल गुरुजी चा नंबर लागला आहे. त्यामुळे या येमुल गुरुजीला दुसऱ्याचे भविष्य हात बघून सांगता येते, मग आपल्याला अशा एखाद्या प्रकरणात पोलिस कारवाई करतील हे स्वतःचे भविष्य त्यामध्ये का दिसले नाही? असा प्रश्न आता पुण्यातील नागरिक विचारू लागले आहेत.











