शिरुर : महान्यूज लाईव्ह
शिक्रापूर परिसरात हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंडास शिक्रापूर पोलिसांनी गावठी पिस्तुलासह गजाआड केले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली. वैभव संभाजी आदक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर तळेगांव ढमढेरे रस्त्यावर लक्ष्मीमाता मंदिर परिसरात एक व्यक्ती हातात तलवार घेऊन दहशत करत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, आरोपी हा तलवार घेऊन फिरत असल्याचे पोलिसांना दिसले.
पोलिसांनी आरोपीस तात्काळ ताब्यात घेतले. यावेळी आरोपीच्या गाडीची तपासणी केली असता, गाडीच्या सीट खाली जिवंत काडतुसासह गावठी पिस्तूल मिळून आला.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तलवार, गावठी पिस्तूल, काडतूस, धारदार सुरा व कार असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार जितेंद्र पानसरे, पोलिस नाईक अमोल दांडगे, श्रीमंत होनमने, शिवाजी चितारे, विकास पाटील आदींनी केली आहे.
सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून विविध कंपन्यांमध्ये धमकावणे, खंडणी वसूल करणे आदी गंभीर स्वरूपाच्या सवयीचा असून कोणाची तक्रार असेल तर शिकाप्रूर पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.











