सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
कोरोना महामारीच्या संकटामुळे दीड वर्षाहुन अधिक काळ पंढरपूर येथील मंदिरे बंद आहे. त्यामुळे देणगीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे आषाढ शु १ आषाढ मासारंभाचे निमित्त साधून माळशिरस येथील सुशीला अरुण माने यांनी घर संसारासाठी दिलेल्या रकमेतून बचत करून खारीचा वाटा म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरास एक लाख दहा हजार एकशे अकरा रुपयाची देणगी अन्नछत्राकरिता दिली.
साई मल्हार अकलूज रोड माळशिरस येथील सुशीला माने यांना वार्धक्याच्या धक्क्यामुळे पंढरपूर येथील मंदिरास भेट देण्यास येणे अशक्य असल्याने त्यांनी समितीमार्फत देणगी घरी येऊन स्वीकारावी, अशी विनंती त्यांनी केली.
त्यास प्रतिसाद देऊन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीचे लिपिक शहाजी मोहन देवकर व सुधाकर भिमराव घोडके यांनी काल रविवारी त्यांचे घरी येऊन अन्नदानासाठी रक्कम स्वीकारून त्याची देणगी पावती त्यांना दिली.
त्यावेळी मंदिरे समिती च्या वतीने श्री व सौ. सुशीला अरुण माने यांचा “श्रीं” ची प्रतिमा, उपरणे, रुक्मिणी मातेचे महावस्त्र व दैनंदिनी देऊन करण्यात आला. यावेळी त्यांचा मुलगा दत्तात्रय अरुण माने, सौ. साधना दत्तात्रय माने व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.











