सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
निमगाव केतकी येथील साठे नगर मधील सोमनाथ उर्फ डड सुभाष मिसाळ या युवकाने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्याच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट दिली. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन तर केलेच.परंतु राज्यमंत्री भरणे यांनी त्यांच्या घरची हलाखीची परिस्थिती पाहून व घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे त्यांनी पाहिले.
यावेळी त्यांना मयत झालेल्या सोमनाथ ची मुलगी खुप आजारी असल्याचे समजले. मुलीच्या आजार साठी येणारा खर्च मोठा असल्याने या कुटुंबाला तिच्यावर उपचार करणे आर्थिक दृष्ट्या कसलेच शक्य नसल्याचे पाहून भरणे यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यांनी सोलापूर येथील हॉस्पिटलला तात्काळ मोबाईल करून या मुलीस तात्काळ ऍडमिट करून उपचार करण्याच्या सूचना केल्या.
या मुलीचा हॉस्पिटलचा सर्व वैद्यकीय खर्च मोफत करून देण्याच्या सूचना भरणे यांनी केल्या.एवढेच नव्हे तर सोलापूरला हॉस्पिटलला जाण्या- येण्यासाठी पाच हजार रुपयांची रोख मदतही दिली. तसेच काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आश्वासन देऊन त्यांनी दिली.
यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी परिस्थिती पाहून केलेली मदत यामुळे मिसाळ कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. यावेळी ग्रामपंचायत मार्फत काही मदत लागल्यास त्या देण्यात याव्या अशा सूचना ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप यांना भरणे यांनी दिल्या.
यावेळी पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ, माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, ग्रामपंचायत सदस्य अजितराव मिसाळ, अमोल राऊत, बाबासाहेब भोंग, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब मिसाळ, ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप, ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष अमोल मिसाळ, दत्तात्रय मिसाळ आदी उपस्थित होते.











