इंदापूर : महान्यूज लाईव्ह
पांडुरंग शिंदे सर्वसामान्यांसाठी लढणारे कार्यकर्ते आहेत त्यांचे सर्वसामान्यांसाठी चे योगदान खूप मोठे आहे,असे गौरवोद्गार माजी सहकार मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग हरिभाऊ शिंदे यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 7 वर्षपूर्ती निमित्त आयोजित रक्तदान शिबिर, कोविड योद्धा सन्मान कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हा कार्यक्रम संत सावतामाळी मंगल कार्यालयात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या हस्ते झाले. इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी, क्रांतीज्योती विचार मंच महाराष्ट्र राज्य ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पुणे जिल्हा यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, डॉ.संदेश शहा, कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, राधा खुडे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ‘लोकांच्या सेवेसाठी पांडुरंग शिंदे यांचे मोठे कार्य आहे. अडीअडचणीत लोकांना ते मदत करतात. सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. तर डॉ.इनामदार यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान मोठे असून कोरोना काळामध्ये व्यक्तींच्या उपचारासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.
यावेळी गटनेते कैलास कदम, नंदकुमार केंगार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सर्वसामान्य गरीब व्यक्तींच्या मदतीसाठी, सहकार्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग शिंदे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद, माजी नगरसेवक शेखर पाटील, युवराज मस्के, रघुनाथ राऊत, गणेश महाजन, बंडा पाटील, प्रशांत उंबरे उपस्थित होते