शिरूर : महान्युज लाईव्ह
कोरोनाने कुटुंबातील माणसे हिरावून नेली. दवाखान्यांची बिले भरता नाकी नऊ आले. दागिने,जमिनी,घरे विकली मात्र तरीही कर्जाचे थकलेले हप्ते, व्यवसायाचे भाडे अन् भरमसाठ आलेली वीजबिले कशी करायची असा सवाल शेतकरी, छोटे व्यावसायिक अन् घरातील सदस्य गमावलेले कोरोनाग्रस्त कुटुंबापुढे आहे.
शिरूर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये अनेक कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामधील काही कुटुंबातील नागरिकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. घरातील कर्ते पुरुष गेल्यामुळे त्या कुटुंबांवर खऱ्या अर्थानं दुःखाचे डोंगर कोसळला आहे.
शिरूर तालुक्यात अनेक कुटुंबातील कर्ते व्यक्ती कोरोनात दगावल्याने अशा कुटुंबांना जीवन व्यतीत करणे जिकिरीचे बनले असून काही ठिकाणी केवळ वयस्कर माणसे, तर कुठे केवळ महिलाच मागे राहिल्या आहेत. अशा कुटुंबांना खऱ्या अर्थाने शासनाने मदत करणे काळाची गरज आहे.
गत दिड वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले आहे.सलग दीड वर्षापासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बंद झाल्या. हजारो कामगार घरी बसून राहिले. अनेक कामगारांना कोरोनाची लागण झाली. या संकटात अनेक कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यात उपचारांसाठी लाखोंची बिले आल्याने अनेकांनी दागिने, वाहने विकली. काहींनी सावकारांकडून कर्जे घेऊन रुग्णालयांची बिले भरली आहेत.
कोरोनाच्या या महामारी रोगामुळे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय देखील अडचणीत सापडला आहे. गेल्या दीड वर्षापासून शेती मालाला देखील योग्य बाजार भाव शेतकऱ्यांना मिळत नाही. अनेक छोटे छोटे व्यवसाय देखील लॉक डाऊन मुळे अडचणीत आले असून हॉटेल व्यवसायिक यात अक्षरश: भरडले गेले असून कामगारांचे पगार, देणी कशी द्यायची असा प्रश्न हॉटेल व्यवसायिक करू लागले आहेत.
छोटे छोटे साखळी उद्योग अडचणीत सापडत चालले आहेत. व्यवसाय मात्र होत नाही, पण गेले दीड वर्षाचे लॉकडाऊन च्या काळातील खोली, जागाभाडे मात्र नियमित भरावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वच व्यवसाय बंद असल्याने अनेक व्यावसायिकांना महावितरण कडून जास्तीचे वीजबिल आले आहे. व्यवसाय बंद असूनही हे आलेले अतिरिक्त वीजबिल कसे भरायचे असा सवाल अनेक व्यावसायिकांनी केला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून शाळा, महाविद्यालय बंद आहेत, मात्र ऑनलाईनची फी मात्र तरीही पालकांना भरावी लागत आहे. सध्या सर्व ग्रामीण भागातील व्यवसायिकांची अवस्था बिकट झाली आहे. पतसंस्था, बँक, यांच्या माध्यमातून काढलेले कर्ज हे देखील थकले आहे. सतत लॉक डाऊन असल्यामुळे पतसंस्था,बँक यांचे कर्जाचे हप्ते दिले गेले नसल्यामुळे ते देखील थकीत चालले आहेत.
एकंदरीत शेतकरी,कामगार वर्ग,छोटे व्यावसायिक, यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले असून शासनाने सर्वसामान्यांचा विचार करून आर्थिक मदत करावी अशी मागणी अनेक नागरिकांकडून केली जात आहे.