खंडाळा : महान्यूज लाईव्ह
धनगर समाजाचे आरक्षणासहित विविध प्रश्न येत्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करावेत अशा मागण्यांचे निवेदन वाई- खंडाळा- महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांना धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने देण्यात आले आहे.
धनगर ऐक्य परिषदेच्या राज्याच्या पदाधिका-यांनी खंडाळा येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी आमदार मकरंद पाटील यांची विविध मागण्याकरिता भेट घेतली.यावेळी धनगर समाजाचे आरक्षण व विविध मागण्यांबाबतचे निवेदन आमदार मकरंद पाटील यांना देण्यात आले.
याप्रसंगी धनगरवाडीचे माजी उपसरपंच जिजाबा काळे, खेड बुद्रुक सरपंच गणेश धायगुडे, विलास धायगुडे, लक्ष्मण शेडगे, दशरथ तालवर, भीमराव धायगुडे, बाळू धायगुडे, दादासाहेब धायगुडे, तानाजी पिसाळ, विशाल शिंदे, अंकुश धायगुडे आदी उपस्थित होते.
याबाबत आमदार मकरंद पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजबांधव आपल्या समस्या गेली ७० वर्षांपासून शासन दरबारी मांडत आहे. परंतु शासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने धनगर समाजबांधवांच्या मागण्या शासनस्तरावर येत्या पावसाळी अधिवेशनात आपणाकडून उपस्थित करण्यात याव्यात.
यामध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी प्रश्न सभागृहात मांडण्यात यावा. जे आदिवासी समाजाला सवलती देण्यात येत आहेत, त्या धनगर समाजाला देण्यात येऊन मागील १ हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे १ हजार कोटी रुपये असे २ हजार कोटी धनगर समाजासाठी त्वरित उपलब्ध करून द्यावेत.
आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक खंडाळा तालुक्यामध्ये उभे करण्यात यावे अशी मागणी धनगर समाज बांधवांच्या वतीने आमदार मकरंद पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.











