दौलतराव पिसाळ: महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील शेंदुरजणे या गावातील वस्तीच्या पुर्वेस एक हरण फिरत असताना गावातील गावठी कुत्र्यांच्या कळपाने त्यावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले होते, त्यावर वन विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीने उपचार केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
शेंदुरजणे ता.वाई येथील वस्तीच्या पूर्वेला एक हरीण गावठाण हद्दीत आले होते. त्यावर गावातील गावठी कुत्र्याच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात ते हरिण गंभीर जखमी झाले. ते पाहून गावातील अभिलाष जगताप, अक्षय जगताप आणी राजमुद्रा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले. त्या वेळी ते गंभीर जखमी झाल्याचे पाहुन वरील कार्यकत्यांनी या घटनेची माहिती वाई वन विभागाचे अधिकारी महेश झांझुर्णे यांना कळविली.
त्यांनी वनरक्षक वैभव शिंदे आणी वनपाल सुरेश पटकारे यांना जखमी हरिण ताब्यात घेण्या साठी शेंदुरजणे या गावात पाठवले. या वन कर्मचाऱ्यांनी जखमी हरिण ताब्यात घेऊन त्यास उपचारासाठी वाई येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले.
तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी त्यास वरखडवाडीतील वन विभागाच्या जंगलात सोडले असता, ते जेमतेम ५० फुट अंतरापर्यंत चालले आणि तेथेच त्याने प्राण सोडले. याची माहिती शेंदुरजणे येथील मदतकर्त्या तरुणांना समजताच त्यांच्याकडून हळहळ व्यक्त करण्यात आली.
वाईच्या शेंदुरजणे गावात भटक्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झालेल्या हरणाचा अखेर मृत्यू